भडकत्या किमतींनी जगणेच झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:38+5:302021-03-04T04:15:38+5:30

अंदाजपत्रक कोलमडले महिन्यात तीनदा महागला सिलिंडर : मासिक खर्चात वाढ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचे दर ...

Living at exorbitant prices has become expensive | भडकत्या किमतींनी जगणेच झाले महाग

भडकत्या किमतींनी जगणेच झाले महाग

Next

अंदाजपत्रक कोलमडले

महिन्यात तीनदा महागला सिलिंडर : मासिक खर्चात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचे दर हे महिन्याभरातच तब्बल तीनदा वाढल्याने आणि मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा २५ रुपयांची वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सततच्या दरवाढीमुळे मासिक अंदाजपत्रक पूर्णत: कोलमडले असून मासिक खर्चात जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातच डिझेलच्या दरवाढीमुळे भाजीपाला, दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीची टांगती तलवार असल्याने सामान्यांचे जगणेच महाग झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

गतवर्षीचा लॉकडाऊनचा काळ हा गृहिणींची परीक्षा घेणारा ठरला. हा कठीण काळ लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातून सरलेला नाही. लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या जाणे, वेतनकपात असे प्रसंग अनेक घरांवर ओढवले. त्यात आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीची भर पडली आहे.

एका कुटुंबात सरासरी चार ते पाच व्यक्ती असतात. त्या अनुसार दर महिन्याचे ‘बजेट’ गृहिणी तयार करतात. मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे नव्या वर्षात गृहिणी बेजार झाल्या आहेत. पूर्वी गॅस सिलिंडरवर विशिष्ट सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा व्हायची. आता ती बंद झाली आहे.

-----------------------------------------------

“दोन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचा दर हा ४०० रुपये होता. आत्ता ही किंमत ८३० रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. एका कुटुंबाकडे किमान २ गॅस सिलिंडर असतात हे गृहीत धरले तर वाढत्या किमतीनुसार त्याची किंमत ही १६८० च्या घरात जाते. भाजीपाला, दुधासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही भडकल्या आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट ठरवणे अवघड झाले आहे.”

-मोनिका श्रीकांत घोडके, गृहिणी

-----------------------------------------------

“लॉकडाऊन काळात घरगुती व्यवसाय सुरू केला. कुटुंबाव्यतिरिक्त व्यवसायासाठीही अतिरिक्त गॅस सिलिंडर लागतात. व्यवसायातून अजून फार उत्पन्न मिळत नाही, पण खर्च वाढत चालला आहे. महिनाखेरीस हातात काहीच पैसे उरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.”

-गायत्री सोमण, गृहिणी आणि व्यावसायिक

----------------------------------------------

गेल्या महिन्याभरात गॅस सिलिंडरच्या दरात तीनदा वाढ झाली. सुरुवातीला सिलिंडरचा दर हा ७२२ रुपये होता. त्यानंतर ७७२ रूपये झाला. मग ७९७ रूपये झाला. सोमवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढ झाल्याने (दि. १) हा दर ८२२ रुपये झाला. जानेवारीमध्ये हाच गॅस सिलिंडरचा दर हा ५९७ रूपये होता.

-गॅस वितरक

---------------------------------------------

Web Title: Living at exorbitant prices has become expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.