समस्यांवर वेड्यांचा जिवंत देखावा

By admin | Published: September 24, 2015 02:52 AM2015-09-24T02:52:55+5:302015-09-24T02:52:55+5:30

दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील झुंज मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीतून शहरातील समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि विकासकामांचा बोजवारा उडालेल्या परिस्थितीतून

The living look of the underlying problems | समस्यांवर वेड्यांचा जिवंत देखावा

समस्यांवर वेड्यांचा जिवंत देखावा

Next

दौंड : दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील झुंज मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीतून शहरातील समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि विकासकामांचा बोजवारा उडालेल्या परिस्थितीतून काल्पनिक मनोरुग्णालय उभारून या रुग्णालयात काल्पनिक वेड्यांचा जिवंत देखावा सादर केला आहे. सुमारे १५ स्थानिक कलावंतांनी या देखाव्यांतून दौंड शहरातील समस्या मांडल्या आहेत.
दरम्यान, हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शहरातील रखडलेल्या रेल्वे कुरकुंभ मोरीतून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा सामना करूनच या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांना जावे लागत असल्याने, या काल्पनिक मनोरुग्णालयातील देखाव्याची वस्तुस्थिती भाविकांच्या नजरेस येत आहे. परिणामी तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या झुंज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य नागरिकांतून गौरव केला जात आहे.
या मनोरुग्णात एकूण १६ वॉर्ड दाखविण्यात आले आहेत, तर रुग्णालयाच्या बाहेर लोकोशेड हनुमान सेवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका उभी केली आहे. दौंडमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज कधी होणार? आयटीआय आणि क्रीडा संकुल कधी होणार?, कुरकुंभ मोरीतील गटारीच्या घाण पाण्याची समस्या केव्हा संपणार आणि तिसऱ्या मोरीचे काम कधी सुरू होणार?, ज्येष्ठ नागरिकांच्या उद्यानाचे काय?, रेल्वे क्वॉटर्स, पोलीस वसाहतीची दुरवस्था, दौंड-पुणे लोकल केव्हा सुरू होणार?, पुरुष आणि महिलांसाठी जागोजागी स्वच्छतागृह कधी होणार?, शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि रस्त्याला फुटपाथ, पथदिवे केव्हा बसविणार?, रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून होणारे अपघात?, सुशिक्षित, बेरोजगार मुलांचा रोजगारीचा प्रश्न? स्त्रीभ्रूणहत्या यासह अन्य काही समस्यांनी काल्पनिक वेडे झालेले युवक वरील सर्व समस्या घेऊन या रुग्णालयात दाखल झालेले आहेत. या रुग्णालयात ज्या वेळेस भाविक येतात, त्या वेळेस प्रत्येक समस्येची परिस्थिती आणि वेडा रुग्ण यांची सांगड जोडली गेलेली आहे.
या देखाव्याची संकल्पना अजय कांबळे यांची असून ,मंडळाचे अध्यक्ष राजेश मंथने, उपाध्यक्ष भीमराव त्रिभुवन आहेत. या रुग्णालयातील जिवंत देखाव्यात महेंद्र राजगुरू, नीलेश रंधवे, सागर त्रिभुवन, गौतम त्रिभुवन, ऋषिकेश चिकाटे, सिद्धांत कांबळे, व्यंकटेश बालन, अमोल आरेणकर, प्रदीप कांबळे, उमेश पाळ, सोनू त्रिभुवन, विठ्ठल पोळ, चेतन आहेर, बबलू पोळ, सागर गरड हे तरुण सहभागी झाले आहेत. याकामी झुंज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: The living look of the underlying problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.