जिवंत व्यक्तीला जाळून लाटली जमीन
By admin | Published: January 6, 2016 12:34 AM2016-01-06T00:34:28+5:302016-01-06T00:34:28+5:30
मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना ते मृत झाले असल्याचे भासवत स्मशानभूमीत त्यांच्या नावाचा जाळण्याचा खोटा दाखला तयार केला
लोणावळा : मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना ते मृत झाले असल्याचे भासवत स्मशानभूमीत त्यांच्या नावाचा जाळण्याचा खोटा दाखला तयार केला. त्या आधारे सदर व्यक्तीचे बनावट मृत्युपत्र व दाखला तयार करून त्या आधारे लोणावळ्यातील पांगोळोलीजवळील कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचा प्रकार करणाऱ्यांचा गेम उघड झाला असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवीत दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांनी दिली़
माणेकराज उदयराज गोलीया (वय ७३, रा़ प्रेसिडेन्ट सोसायटी, विलेपार्ले, प़ मुंबई) यांनी याप्रकरणी ५ नोव्हेंबर २०१५ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची फि र्याद दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे़ माणेकराज गोलीया यांच्या बंगल्याचे केअर असल्याचे भासविणारे अजय भीमराव पाटील (वय ३७, रा़ हडपसर, पुुणे), ज्ञानेश्वर भगवान गायकवाड (वय ४०, रा़ मार्केटयार्ड, पुणे),
शिवप्रताप हरिविजय भोसले (वय ३१, रा़ दत्तवाडी, पुणे), ज्ञानेश्वर कोंडिबा अलकापुरे (वय ४०, रा़ हडपसर, पुणे) या चौघांनी हा सर्व प्रकार केला आहे़ यापैकी भोसले याला १९ नोव्हेंबरला, तर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीचा दाखला घेण्यासाठी पॅनकार्ड देऊन सहकार्य करणारा अजय सुरेश जैन (वय ४२, रा़ नाना पेठ, पुणे) याला ३ डिसेंबरला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे़ हे दोन्ही आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. (वार्ताहर)