समाविष्ट गावांच्या २५० टन कचऱ्याचा पालिकेवर भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:10 AM2021-07-08T04:10:04+5:302021-07-08T04:10:04+5:30
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून दिवसाला साधारणपणे २५० टन कचरा निर्माण होतो. आता पालिकेला हा कचरा ...
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून दिवसाला साधारणपणे २५० टन कचरा निर्माण होतो. आता पालिकेला हा कचरा उचलण्याची आणि त्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करावी लागणार आहे. यासोबतच गावांमध्ये कचराप्रक्रिया प्रकल्पही उभारावे लागणार आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कचऱ्यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
घनकचरा विभागाकडून ग्रामीण भागातील कचऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. नऱ्हे, कोंढवे-धावडे, वाघोली, मांजरी बुद्रूक या चार गावांत सर्वाधिक १३६ टन कचरा निर्माण होतो. समाविष्ट गावांमध्ये वाढलेली अनधिकृत बांधकामे, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा कचरा नदीपात्र, नाले, कालवा तसेच मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेने मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. या गावांच्या अनेक भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. अनेकदा हा कचरा जाळला जातो. यासंदर्भात, लवकरच महापालिका व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.