अबब...! पुणे शहरातील रस्त्यावर ३८ लाख वाहनांचा भार! इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:57 PM2024-07-30T13:57:27+5:302024-07-30T13:57:40+5:30

पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून, सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत

Load of 38 lakh vehicles on the roads of Pune city Increase in electric vehicle purchases | अबब...! पुणे शहरातील रस्त्यावर ३८ लाख वाहनांचा भार! इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीत वाढ

अबब...! पुणे शहरातील रस्त्यावर ३८ लाख वाहनांचा भार! इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीत वाढ

पुणे : शहरातील एकूण वाहनसंख्या २०२४ वर्षाच्या जुलैअखेरपर्यंत ३८ लाख ६३ हजार ८४९ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीतही वाढ झाली आहे. वाढती वाहनसंख्या पाहता शहरातील रस्त्यावरचा भार वाढत चालला आहे. परिणामी वाहतूक काेंडीबराेबरच हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. पीएमपीच्या इलेक्ट्रिक, सीएनजी बसने वायू, ध्वनी प्रदूषणात काही प्रमाणात घट झाली असली तरी २०२३ या वर्षात शिवाजीनगर येथे सर्वाधिक हवा प्रदूषण झाल्याचे आढळून आले आहे. पुणे महापालिकेने यंदाचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल जाहीर केला आहे. त्यातून ही बाब पुढे आली आहे.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून, सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. शहरात २०२३ मध्ये २ लाख ९३ हजार ४७१, तर २०२२ या वर्षात २ लाख ५४ हजार ९०७ वाहनांची भर पडली होती. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १ लाख ८ हजार ०७३ आहे. बीएस६ वाहनांची संख्या ८ लाख ८० हजार आहे.

इलेक्ट्रिक, सीएनजी बसने झाली वायू अन् ध्वनी प्रदूषणात घट 

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने आपल्या ताफ्यातील वाहनांचे सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यास प्राधान्य दिले आहे. पीएमपीकडे १ हजार ८८७ बस होत्या. त्यापैकी १ हजार १८७ बस सीएनजीवर आहेत आणि ई-बसची संख्या ४७३ आहे. केवळ १२.३ टक्के बस डिझेलवर धावत आहेत. एकूण ताफ्याच्या ८८ टक्के बस स्वच्छ इंधनवर चालणाऱ्या आहे. इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी होत आहे. पीएमपीएमएलच्या ४७३ इलेक्ट्रिक बस मार्च २०२४ पर्यंत एकूण प्रवास चार कोटी किमी पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे अंदाजे सात हजार टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे.

सर्वाधिक हवा प्रदूषणात शिवाजीनगर अव्वल 

पुणे शहरात २०२३ या वर्षात शिवाजीनगरला सर्वाधिक हवा प्रदूषण झाल्याचे आढळून आले आहे. यात पीएम १० चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर येथे सर्वाधिक नोंदविले आहे. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी एअर क्वालिटी इंडेक्स पीएम १० च्या बाबतीत १ दिवस वाईट, पीएम २.५ च्या बाबतीत ३० दिवस वाईट, तर एक दिवस अत्यंत वाईट होते.

कवडीपाठ येथे पक्षाच्या सर्वाधिक प्रजाती :

पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी पक्षाच्या सर्वाधिक २६३ प्रजाती, तर एआरएआय टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत.

Web Title: Load of 38 lakh vehicles on the roads of Pune city Increase in electric vehicle purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.