लोकलला दोन डोस घेतलेल्याना परवानगी, मग दौंड डेमूला का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:37+5:302021-09-04T04:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी प्रशासनाने दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली. त्याच्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी प्रशासनाने दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली. त्याच्यासाठी १५ ऑगस्टपासून युनिव्हर्सल पासदेखील दिला जात आहे. मात्र अद्याप पुणे ते दौंड दरम्यान डेमूने प्रवास करण्यासाठी दोन लस घेतलेल्या प्रवाशांना परवानगी दिली नाही. स्थानिक प्रशासनाचा हा दुजाभाव आमच्यावर अन्याय करणारा असल्याची भावना दौंडच्या प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
दौंडचे प्रवासी डेमूने प्रवास करीत पुणे गाठत. कोविडपूर्वी ही संख्या २० ते २२ हजार इतकी होती. आता केवळ राज्य सरकारच्या निर्बंधामुळे हजार ते पंधराशे प्रवासी प्रवास करीत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांंनाच डेमूने प्रवास करण्याची परवानगी आहे. तेव्हा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लावलेली अट आता शिथिल करून पुणे-लोणावळा लोकलप्रमाणे ज्या प्रवाशांचे लसीचे दोन डोस झाले आहे, त्यांना प्रशासनाने युनिव्हर्सल पास देऊन डेमूतून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दौंडसह अन्य छोट्या स्थानकावरचे प्रवासी करीत आहे.
कोट : १ राज्य सरकारने सुरुवातीला केवळ मुंबई लोकलपुरती परवानगी दिली. आता पुणे-लोणावळासाठी परवानगी दिली. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व दोन डोस लस घेतलेल्यांसाठी हा आदेश लागू करावा. मुंबईव्यतिरिक्त राज्यातील इतर जनतेसाठी अशी सापत्न वागणूक का?
विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ.
कोट : २
राज्य सरकारने हे निर्बंध लावले आहेत. त्यांनी ते हटविल्यानंतर डेमूतून प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.