Maharashtra | कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्येच निवडणुका शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:27 PM2022-05-19T15:27:20+5:302022-05-19T15:58:16+5:30

राज्य निवडणूक आयोगाने खरेच इच्छाशक्ती दाखवल्यास निवडणुका लवकर

local body elections will be held in June but not in July maharashtra | Maharashtra | कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्येच निवडणुका शक्य!

Maharashtra | कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्येच निवडणुका शक्य!

Next

नितीन चौधरी

पुणे : ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे. जुलैमध्ये मात्र, निवडणुका घेणे शक्य होणार नाही असे दिसते.

पावसामुळे जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, या राज्य निवडणूक आयोगाच्या दाव्याला गेल्या पाच वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीने खोटे ठरविले आहे. कोकण व्यतिरिक्त उर्वरित राज्यात जूनमध्ये पावसाचे सरासरी दिवस १५ पेक्षा कमी असल्याचे आकड्यांवरून दिसत आहे. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येणार असला तरी जूनमध्ये त्याचे प्रमाण सरासरी इतकेच असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने खरेच इच्छाशक्ती दाखवल्यास निवडणुका राज्यात होऊ शकतात. जुलैत बहुतांश राज्यात पावसाचे प्रमाण २० ते २५ दिवस असल्याचे दिसते. त्यामुळे जुलैत निवडणुकांसाठी वातावरण योग्य नाही.

कृषी खात्याच्या सांख्यिकी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या डेटाच्या आधारे हा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार जूनमध्ये कोकणात गेल्या पाच वर्षांत २०१९ वगळता चारही वर्षांत सरासरी २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये कोकणात निवडणुका घेता येणे शक्य नाही. मात्र, उर्वरित राज्यात २०२० व २०२१ वगळता इतर तीन वर्षांत सरासरी पावसाचे दिवस हे ७ ते १५ इतके आहेत. तर २०२० व २०२१ मध्ये हे दिवस पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात १५ ते १८ इतके आहेत. त्यामुळे येथेही निवडणुका घेणे शक्य असल्याचे दिसते.

जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याचे या आकडेवारीवरून दिसते. कोकणात संपूर्ण महिना पाऊस पडत असल्याचे दिसते. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांत हे प्रमाण सरासरी २० ते २५ दिवस इतके आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हा पाऊस १५ ते २२ दिवस इतका पडल्याचे स्पष्ट होत आहे. याच महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाने महिन्याची सरासरी गाठल्याचे ही दिसते. त्यामुळे हा महिना पावसाचा असल्याचे दिसून येते. परिणामी या महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही.

ऑगस्ट महिन्यातही गेल्या पाच वर्षांच्या आकड्यांचा विचार करता कोकणात पूर्ण महिनाभर पाऊस पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात २०२० चा अपवाद वगळता पावसाचे प्रमाण ७ ते १५ दिवस असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये राज्यात बहुुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. यावर्षी या महिन्यात सरासरी पावसाचे दिवस २० पेक्षा जास्त असल्याचे आकड्यांवरून दिसते. हीच परिस्थिती साधारण सप्टेंबरमध्ये ही दिसून येते.

यापूर्वी निवडणुका इतक्या लांबल्याचे दिसत नाही. मात्र, जूनमध्ये निवडणुका झाल्याचे आठवत नाही. हवामानाच्या अंदाजावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो.

- जे. एस. सहारिया, माजी निवडणूक आयुक्त

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पहिल्या टप्प्याचा अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता. मात्र, त्याचे वितरण समान असेल. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजात चित्र आणखी स्पष्ट होईल.

- डॉ. कृष्णानंद होसाळीकर

Read in English

Web Title: local body elections will be held in June but not in July maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.