'तो' लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून लोकांना गंडा घालायचा; अनेक संशयित वस्तू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 09:21 PM2020-11-11T21:21:33+5:302020-11-11T21:29:43+5:30
लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची व अनेकांना फसवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पुणे : लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून अनेकांची फसवणुक करणाऱ्याला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका तोतया आर्मी अधिकाऱ्याला पकडले.
अंकित कुमार सिंह (वय २३, रा. किरकटवाडी, मुळे हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० ओळखपत्रे, २ मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख , लष्कराची महत्वाची ओळख चिन्हे, लष्करी बुट, पट्टा, लष्कराचे चिन्ह असलेली टोपी असा वस्तू सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची व अनेकांना फसवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस अंमलदार मंगेश भगत, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, काशिनाथ राजापूरे, सुनिता माने यांनी किरकटवाडी येथे सापळा रचून अंकित सिंह याला पकडले़ त्याची पत्नी मीनाक्षी हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याने अनेक जणांना फसविले असल्याची शक्यता असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरु असून त्याने ही ओळखपत्रे व इतर लष्कराची संबंधित वस्तू कोठून आला याची माहिती घेण्यात येत आहे.