आळंदी परिसरात वेश्याव्यवसायाने स्थानिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:47+5:302021-03-04T04:16:47+5:30
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची येथील पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रामगृह ते देहूफाटा, वाय जंक्शन परिसरात वेश्याव्यवसाय केला जात आहे. मात्र, अशा ...
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची येथील पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रामगृह ते देहूफाटा, वाय जंक्शन परिसरात वेश्याव्यवसाय केला जात आहे. मात्र, अशा किळसवाण्या प्रकारांमुळे स्थानिक सर्वसामान्य महिला तसेच विद्यार्थी मुलींना उपद्रव होत आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आळंदी-देवाची येथील पुणे - आळंदी रस्त्यावरील देहूफाटा परिसरात विशेषताः विश्रामगृह ते वाय जंक्शन परिसरात सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक महिला तोंडाला स्कार्फ बांधून रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी चालकांना हात करून इशारे करतात. संबंधित महिला नियमितपणे या रस्त्यावर फिरत असून देहविक्रय करत आहेत. वास्तविक अशा महिलांच्या वागणुकीमुळे इतर सर्वसामान्य महिला ज्या कामानिमित्त बाहेर जातात त्यांनाही याचा त्रास होत आहे.
चाकण चौक येथील नवीन पूल ते देहूफाटा, जुना पुलालगत भागेश्वरी धर्मशाळेसमोरिल फुटपाथ, देहूफाटा बसथांबा, विश्रामगृहासमोर, तसेच काळे कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यांवर या देहविक्री करणाऱ्या महिला सातत्याने फिरत आहे. या प्रकारामुळे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राचे नाव खराब होत आहे. शहरातील सार्वजनिक हित लक्षात घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो ओळ : दिघी पोलिसांना लेखी निवेदन देताना नगरसेवक सचिन गिलबिले.