भामा आसखेड जलाशयात स्थानिक आदिवासींना मासेमारी करण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:11 PM2019-08-22T15:11:57+5:302019-08-22T15:12:38+5:30
आदिवासींच्या नावावर मासेमारीचा ठेका घेण्यासाठी भलतीच मंडळी पुढाकार घेत आहेत.
आंबेठाण : भामा आसखेड धरण जलाशयात स्थानिक आदिवासींना मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ठेकेदारांकडून गरीब आदिवासींवर दांडगाई करण्यात येत असून पारंपारिक उपजीविकेचे साधन असलेल्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याने ठाकर, कातकरी, भोई समाजाच्या आदिवासी बांधवांनी नुकताच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात मोर्चा काढला होता.
लोकशासन आंदोलनच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी केले होते. भामा आसखेड धरण जलाशयावर स्थानिक आदिवासी समाजातील अनेकांची उपजीविका चालते. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये अन्यथा चुकीच्या पद्धतीने दिलेला ठेका रद्द करावा, स्थानिक मच्छिमारांच्या पोटा पाण्याचा प्रश सोडवावा अशी मागणी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराबाबत आदिवासींनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आदिवासींच्या नावावर मासेमारीचा ठेका घेण्यासाठी भलतीच मंडळी पुढाकार घेत आहेत. आदिवासींना पुढे करून मासेमारीचा ठेका घेणारे ठेकेदार परप्रांतीय मंडळींना भामा आसखेड धरण जलाशयात मासेमारी करू देतात ; मात्र स्थानिक आदिवासींना मासेमारीसाठी महिन्याला अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक पैशांची ( महिना पास ) मागणी करीत असल्याचे स्थानिक मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे. या बाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा आणि त्यातूनही काहीही मार्ग न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा महिला मच्छिमारांनी दिला आहे.
-----------------------------------------------------------------