स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा
By admin | Published: January 9, 2016 01:37 AM2016-01-09T01:37:34+5:302016-01-09T01:37:34+5:30
औद्योगिक पट्ट्यासाठी बळीराजाच्या जमिनी गेल्या; पण औद्योगिकीकरणाचा लाभ त्यांना न मिळाल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आ
राजगुरुनगर : औद्योगिक पट्ट्यासाठी बळीराजाच्या जमिनी गेल्या; पण औद्योगिकीकरणाचा लाभ त्यांना न मिळाल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरात स्थानिक तरुणांना नोकऱ्या आणि व्यवसायाची संधी मिळाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी येथे दिले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृह असे नामकरण करण्यात आले. त्या फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव राम कांडगे लिखित ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ ग्रंथाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप वळसे पाटील होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, माजी प्राचार्य जे. डी. टाकळकर, नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘चाकण परिसर हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा औद्योगिक परिसर झाला आहे. जगातील नामवंत कंपन्या चाकण-तळेगाव परिसरात कारखानदारी करीत आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यांच्या मुलांना कारखानदारीत संधी उपलब्ध नाही. यातून मार्ग काढला पाहिजे. या कंपन्या देशाच्या संपत्तीत भर घालीत आहेत. पण स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनात आणि कुटुंबात फारसा बदल झाला नाही. त्यांचे दारिद्र्य दूर झाले नाही. या औद्योगिकीकरणाचा उपयोग नाही. या वैभवाचा वाटा येथील आदिवासी व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. सरकार शिक्षणाबाबत उदासीन असून, सरकारकडून शिक्षणासाठी पुरेसा निधी मिळत नाही. विनाअनुदानित वर्ग चालवावे लागतात आणि नवीन वर्गांना परवानगी दिली जात नाही, अशी खंत या वेळी खासदार आढळराव यांनी व्यक्त केली. सामाजिक प्रश्न, राजकीय गुंता असो की नैसर्गिक आपत्ती असो शरद पवार एकहाती सोडवितात. शेतकरी अडचणीत असतो तेव्हा त्याच्या समस्येची उत्तरे त्यांच्याकडेच असतात, असे बुट्टे पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयाची प्रगती सुरू असून कम्युनिटी कॉलेज, आॅटोमोबाईल प्रशिक्षण, रिटेल मॅनेजमेंट असे उपक्रम सुरू केल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले.