पुण्यातील मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 02:56 PM2021-05-19T14:56:52+5:302021-05-19T14:56:58+5:30
बावीस वर्षीय अट्टल गुन्हेगाराची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे: मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. परेश उदय मेहता (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
परेश मेहता याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी साखळी, सुरा या सारख्या हत्याराने खुन, दुखापत, दंगा, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील ६ वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या भितीमुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी एमपीडीए कायद्यान्वये परेश मेहता याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्तांना सादर केला. अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
८ महिन्यात शहरात दहशत निर्माण करणारे २१ अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या ८ महिन्यात शहरात दहशत निर्माण करणार्या २१ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करुन त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे