लोकलप्रमाणेच पॅसेंजरला हवी राज्य सरकारची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:23+5:302021-08-17T04:17:23+5:30
रेल्वे बोर्डने प्रत्येक विभागाकडून मागितला अहवाल. लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: रेल्वे बोर्डने पुण्यासह देशातील सर्व रेल्वे विभागांना कोणकोणत्या मार्गावर ...
रेल्वे बोर्डने प्रत्येक विभागाकडून मागितला अहवाल.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: रेल्वे बोर्डने पुण्यासह देशातील सर्व रेल्वे विभागांना कोणकोणत्या मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरू करता येईल याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुणे विभागाने पुणे-लोणावळा, पुणे-सातारा-कोल्हापूर, पुणे - दौड दरम्यान एक पॅसेंजर रेल्वे चालविण्याबाबत समर्थता दर्शवली आहे. मात्र राज्य सरकारने पॅसेंजर गाड्यावर निर्बंध लावले आहे. त्यात सूट मिळाल्यानंतरच पॅसेंजर गाड्या धावतील. मात्र दोन्ही लस घेतलेल्या प्रवाशांनाच यातून प्रवास करण्याची मुभा मिळण्याची शक्यता अधिक आहे.
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाकाळात प्रवासीसंख्येवर मर्यादा आणली गेली. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट गाड्यांना आरक्षित गाड्यांचा दर्जा देऊन जनरल तिकीट व पॅसेंजर गाड्या बंद केल्या. त्यामुळे आता पॅसेंजर गाड्या सुरू करताना प्रवासीसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारची परवानगी मिळणे आवश्यक आहे. यास राज्य सरकारने अद्याप परवानगी न दिल्याने पॅसेंजर गाड्या धावू शकल्या नाहीत.
बॉक्स १
सध्या बंद असलेल्या पॅसेंजर :
पुणे विभागात जवळपास १२ पॅसेंजर गाड्या आधी धावत होत्या. त्या सर्व गाड्या आता बंद आहेत. यात पुणे -सोलापूर, पुणे- सातारा, पुणे - दौंड, पुणे- कर्जत - पनवेल आदी गाड्यांचा समावेश आहे. त्या सर्व गाड्या आता बंद आहेत.
बॉक्स २
सध्या सुरू असलेल्या एक्सप्रेस गाड्या :
पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेस, पुणे - दानापूर ,पुणे - बिलासपूर, पुणे - जयपूर, डेक्कन, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, पुणे-नागपूर, पुणे-हावडा, पुणे -वेरावल, पुणे - निझामुद्दीन, पुणे -दरभंगा, पुणे - गोरखपूर आदी गाड्या धावत आहेत.
बॉक्स ३
सध्या बंद असलेल्या एक्सप्रेस :
पुणे -सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, पुणे - सोलापूर इंटरसिटी , पुणे - मुंबई प्रगती एक्सप्रेस, पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, आदी गाड्या बंद आहेत.
चौकट
“रेल्वे बोर्डने सर्वच विभागांना कोणत्या सेक्शनमध्ये पॅसेंजर गाड्या सुरू होऊ शकतात, अशी विचारणा केली. त्याप्रमाणे त्यांना अहवाल दिला आहे. पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे.”
प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर, मध्य रेल्वे.