दोन महिन्यांनी कळणार पीएमपीच्या बसचे लोकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:08+5:302021-08-26T04:14:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीच्या बसवर निरीक्षण ठेवणारी, प्रवाशांना मार्गाची माहिती देणारी आयटीएमएस (इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीच्या बसवर निरीक्षण ठेवणारी, प्रवाशांना मार्गाची माहिती देणारी आयटीएमएस (इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम) ही गेल्या महिन्याभरापासून करार संपल्याने बंद आहे. पीएमपीएमएल प्रशासन आता ह्या कामांसाठी दुसरी एजन्सी शोधत आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र हा सगळा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पीएमपी व एनइसी या जापनीज कंपनीसोबत आयटीएमएस संदर्भात करार झाला होता. मात्र त्याची मुदत २६ जुलै २०२१ रोजी संपली. आता पीएमपीचे कर्मचारी आपल्या पातळीवर प्रवाशांना मार्गाची माहिती देणारे इलेक्ट्रिक बोर्डचे काम करीत आहे. आयटीएमएस ही यंत्रणा बंद असल्याने पीएमपीच्या स्वारगेट येथील नियंत्रण कक्षात गाडीचे लोकेशनबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे गाड्या वेळेवर धावतात की नाही याचीदेखील पीएमपी प्रशासनाला माहिती मिळत नाही. मात्र आम्ही यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असे प्रशासनाने म्हटले आहे.
चौकट
“कराराचा कालावधी संपल्याने आयटीएमएसचा वापर थांबला आहे. आम्ही ही पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी दुसरी
एजन्सी नेमण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.”
-डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल