स्वच्छतेत पुणे रेल्वे स्थानकाला टॉप टेनमध्ये स्थान
By admin | Published: May 18, 2017 05:45 AM2017-05-18T05:45:01+5:302017-05-18T05:45:01+5:30
देशातील एवन दर्जाच्या रेल्वे स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाने स्वच्छतेमध्ये टॉप टेन स्थानकांमध्ये स्थान मिळविले आहे. मागील वर्षी पुण्याला शेवटचा म्हणजे
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील एवन दर्जाच्या रेल्वे स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाने स्वच्छतेमध्ये टॉप टेन स्थानकांमध्ये स्थान मिळविले आहे. मागील वर्षी पुण्याला शेवटचा म्हणजे ७५ वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रेल्वे स्थानकाने यंदा ६६ क्रमांकाची प्रगती करीत यंदा नववा क्रमांक पटकावला आहे.
रेल्वे मंत्रालयाने ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत मागील वर्षीपासून देशातील रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकांतील स्वच्छता या निकषाच्या आधारे हे सर्वेक्षण केले जात आहे. मागील वर्षी इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने हे सर्वेक्षण केले होते. यावर्षी त्यात बदल करून सर्वेक्षणाचे काम क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेकडे देण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला.
सर्वेक्षणामध्ये देशातील एकूण ७५ ए वन आणि ३३२ ए दर्जाच्या अशा एकूण ४०७ स्थानकांची पाहणी करण्यात आली. ए वन स्थानकांमध्ये पुणे स्थानक नवव्या क्रमांकावर, तर मध्य रेल्वेत पहिल्या क्रमांकावर आले आहे. मागील वर्षी पुणे स्थानक अखेरच्या क्रमांकावर घसरले होते. यंदा त्यामध्ये ६६ क्रमांकाची मोठी प्रगती करत पुणे स्थानकाने टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. देशात ए वन स्थानकांमध्ये सर्वाधिक प्रगती केलेल्या स्थानकांमध्ये पुणे स्थानकांचा क्रमांक अव्वल आहे. सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने मुख्य फलाट, पार्किंग, मुख्य प्रवेशद्वार, प्रतीक्षा कक्ष यातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तसेच प्रवाशांचेही मत जाणून घेण्यात आले.मागील वर्षीपासून रेल्वे स्थानकात स्वच्छतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके नेमण्यात आली होती. स्थानक परिसर, प्रतीक्षा कक्ष, फलाटांवर स्वच्छता करण्याचे त्यावर देखरेख ठेवण्याचे काम ही पथके करत होती. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. पोस्टर, बॅनर, पथनाट्य या माध्यमातून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
मागील वर्षाच्या शेवटच्या स्थानामुळे जोमाने कामाला...
- पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी पुणे स्थानक टॉप टेनमध्ये आल्याबद्दल माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘मागील वर्षी ७५ वा क्रमांक मिळाल्याने
धक्का बसला होता. आम्ही स्वच्छतेबाबत आधीपासूनच प्रयत्न करीत आहोत.’’
पण मागील वर्षी शेवटचे स्थान मिळाल्याने अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली. सर्व विभाग, अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. केवळ स्वच्छताच नाही तर सौंदर्यीकरणावरही भर
देण्यात आला. त्यामुळे आज
पुणे स्थानक पुढे गेले आहे.
यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
महत्त्वाचा होता. यापुढील काळातही हे प्रयत्न असेच
सुरू राहतील, असे दादाभॉय
यांनी सांगितले.
ए वन दर्जातील टॉप टेन रेल्वे स्थानके
१) विशाखापट्टणम, २) सिकंदराबाद जंक्शन, ३) जम्मू तावी, ४) विजयवाडा,
५) आनंद विहार टर्मिनल, ६) लखनौ जंक्शन, ७) अहमदाबाद, ८) जयपूर,
९) पुणे, १०) बँगलोर सिटी