पुरंदर विमानतळाची जागा निश्चित नाही : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:38+5:302021-07-12T04:08:38+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली भेट भुलेश्वर : नियोजित विमानतळासाठी तीन जागांची पहाणी करुन माहिती गोळी केली जात आहे.विमानतळासाठी ...
खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली भेट
भुलेश्वर : नियोजित विमानतळासाठी तीन जागांची पहाणी करुन माहिती गोळी केली जात आहे.विमानतळासाठी अद्यापही कोणतीही जागा निश्चित केलेली नाही .तीन जागांपैकी जी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल त्या ठिकाणी विमानतळ करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी,रिसे,पिसे,नायगाव,पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी व आंबी या भागातील विमानतळ संघर्ष समितीने आज शरद पवारांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते.त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
विमानतळविरोधी संघर्ष समितीने निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की पुरंदर तालुक्याच्या आमदारांनी या गावांमधील लोकांना विश्वासामध्ये न घेता परस्पर विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त ,मुख्य कार्यकारी आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व जिल्हाधिकारी पुणे यांना पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणून सुचवली आहे. या गावांमधील रहिवासी हे मूळ शेतकरी आहेत . पुरंदर उपसा सिंचन व जानाई शिरसाई योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत. भागातील जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहेत.डाळिंब, सीताफळ ,पेरू ,अंजीर इत्यादी फळ बागा असून ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे .विमानतळासाठी शेतजमीन बळजबरीने घेतल्यास शेतकरी उध्वस्त होऊन तसेच नवीन सुचवलेल्या पर्याय जागेबाबत चुकीची माहिती पुरवल्याची स्पष्ट झाले आहे. विमानतळासारखा प्रकल्प पर्यायी जागेत झाल्यास प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात धोका निर्माण होऊन वन्यजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे .त्यामुळे सदर जागेवर विमानतळ नको अशी येथील स्थानिक शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे .
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील ,संतोष कोलते, विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव,उद्धव भगत, शशीभाऊ गायकवाड, हरिदास खेसे,चंद्रकांत चौंडकर, दादा आंबोले, महेश कड , अंकुश भगत,शैलेश रोमन ,सदाशिव चौंडकर,किरण साळुंखे , महेंद्र खेसे, भरत बोरकर, पोपट खैरे, प्रदीप खेसे ,संदीप रोमण आदी उपस्थित होते.
पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक म्हणाले कि या भागात विमानतळ झाल्यास येथील शेतकरी उद्वस्त होतील यासाठी पुरंदरमध्ये विमानतळ होऊ नये म्हणुन राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यामुळे शेतक-यांच्या बाजुने उभे राहुन नक्कीच न्याय देतील .
पुरंदर विमानतळ संघर्ष समिती व खासदार शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करताना