‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:10 PM2024-05-22T13:10:19+5:302024-05-22T13:10:41+5:30
...त्या ‘ब्लॅक’ हॉटेलचा मद्य परवाना हा पंचशील इन्फ्रास्क्ट्रक्चरचे संस्थापक सागर चोरडिया यांच्या नावाने आहे. अल्पवयीन मुलांना दारू विक्री केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक हॉटेलवर कारवाई करून टाळे ठोकले आहे. चोरडिया यांच्या नावाने असलेला मद्य परवाना रद्द केला जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे : अल्पवयीन मुलाने दिलेल्या कारच्या धडकेत दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. पण, अपघातापूर्वी अल्पवयीन मुलाने मेरियट सूट्समधील ब्लॅक हॉटेलमध्ये दारूची पार्टी केली होती. त्या ‘ब्लॅक’ हॉटेलचा मद्य परवाना हा पंचशील इन्फ्रास्क्ट्रक्चरचे संस्थापक सागर चोरडिया यांच्या नावाने आहे. अल्पवयीन मुलांना दारू विक्री केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक हॉटेलवर कारवाई करून टाळे ठोकले आहे. चोरडिया यांच्या नावाने असलेला मद्य परवाना रद्द केला जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी पुण्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मेरियट सूट्समधील ‘ब्लॅक’ आणि मुंढवा येथील ‘कोझी’ रेस्टॉरंट ही नावे चर्चेत आली आहेत. पुण्यातील रिअल इस्टेटमधील प्रतिष्ठित नाव असलेल्या सागर चोरडिया यांचा मेरियट सूट्समधील ‘ब्लॅक’ हॉटेलशी संबंध आहे. या हॉटेलचा मद्य परवाना सागर चोरडिया यांच्या नावावर आहे. जयेश बोनकर हे या हाॅटेलचे मालक आहेत. पंचतारांकित हॉटेल मॅरियट सूट्सच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये १९ मे रोजी जाऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाहणी केली. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. या तपासणीत आवश्यक नोंदी बार कर्मचारी तसेच अधिकारी यांच्याकडे नव्हत्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार येथे रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. सोबत रोजगारपत्रही देण्यात आले नाही. याप्रकरणी चोरडिया यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दिवसाला फक्त एकच कारवाई
पब, बार रेस्टॉरंट परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणे, अल्पवयीन मुला-मुलींना मद्य पुरविणे, नोंदवही अपुरी ठेवणे, नोकरनामे सादर न करणे, परवाना नसलेल्यांना मद्य पुरविणे अशा त्रुटींवरून उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात केवळ २९७ कारवाया केल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. याचाच अर्थ उत्पादन शुल्क विभाग दिवसाला एकच कारवाई करत आहे. त्यामुळे चालक-मालक रात्री उशिरापर्यंत बिनधास्त पब उघडे ठेवत आहेत.
कोण आहेत सागर चोरडिया?
अतुल आणि सागर चोरडिया या बंधूंनी पंचशील रियल्टीची स्थापना केली. पुणे शहरातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर या वास्तू त्यांच्या कामाच्या लँडमार्क बनल्या आहेत. भारतातील पहिला ट्रम्प टॉवर त्यांनीच डिझाईन केला आहे. द ट्रम्प ऑर्गनायझेशन, यो, जेडब्लू मॅरियट, द रिट्झ-कार्लटन, हिल्टन, ओकवूड आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशन यांसारख्या जागतिक स्तरावरील भागीदारांसह, पंचशीलने पुणे-भारत जगाच्या नकाशावर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
रोज कोट्यवधींच्या कार वापरणारा अग्रवाल १५ लाखांच्या कारने जागा शोधत फिरला -
छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन चालकाचा वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात ४० वर्षांपासून सक्रिय असलेल्या ब्रह्मा कॉर्प या बड्या बांधकाम उद्योग समूहाचा मालक असलेला अग्रवाल हे बांधकाम क्षेत्रात मोठे प्रस्थ आहे.
अग्रवालच्या कंपनीने पाच व सात तारांकित हॉटेलचेही बांधकाम केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, किमान ८ ते १२ मोठ्या, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अलिशान कार त्याच्याकडे आहेत. त्यापैकीच एका कारने दोन तरुणांचा बळी घेतला. रोज कोट्यवधींच्या कारने फिरणारा अग्रवाल अटकेच्या धाकाने १५ लाखांच्या कारने फिरत लपायला जागा शोधत होता.
'बच्चे से गलती हो गयी, इसी लिये इधर आयां
अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पहाटे एका हॉटेलमधून ताब्यात घेत त्याला पोलिस आयुक्तालयात नेऊन बसवले. पोलिसांनी यावेळी त्याला विविध प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अग्रवाल ने 'बच्चे से गलती हो गयी, इसी लिये इधर आयां, असे सांगत पोलिसांपुढे मुलाची बाजू घेतली.
७६ रूफटॉप हॉटेल्सला नोटिसा
पुणे शहरातील ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सपैकी ७६ हॉटेल्सला नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यापैकी ५३ हॉटेल्सवर कारवाई केली.
सहा हॉटेलमालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद झाला. सात हॉटेल्समालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे, तर नऊ हॉटेल्सवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागांत इमारतींच्या टेरेसवर, सामाईक जागेत शेड उभी करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल सुरू राहतात. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो.
बॉलर पबवर यापूर्वी दोनदा कारवाई
- पब रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही पुण्यात अनेक पब व बार रेस्टॉरंट पहाटे चारपर्यंत उघडे राहतात. कल्याणीनगर घटनेतील मृत ज्या बॉलर नावाच्या पबमधून बाहेर पडले ती वेळ रात्री दोनची होती.
- याचाच अर्थ हा पब रात्री दोननंतरही सुरू होता. यापूर्वी उत्पादन शुल्क विभागानेच याच बॉलर पबवर चार महिन्यांत दोनदा कारवाई करून सुमारे १ लाखाचा दंडही ठोठावला हाेता. माहिती अधिकार कार्यकर्ता अक्षय जैन यांनी मागविलेल्या माहितीतून हे उघड झाले आहे.