प्रलंबित नियुक्त्यांसाठी ‘लॉकडाऊननियुक्त्या’ हॅशटॅग मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:19+5:302021-08-20T04:14:19+5:30
प्रलंबित नियुक्त्यांच्या मागणीसाठी ‘लॉकडाऊननियुक्त्या’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा प्रक्रियेत गुणवत्तायादी प्रमाणे शिफारस केलेल्या ...
प्रलंबित नियुक्त्यांच्या मागणीसाठी ‘लॉकडाऊननियुक्त्या’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
परीक्षा प्रक्रियेत गुणवत्तायादी प्रमाणे शिफारस केलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करून नियुक्ती दिली जाते. या प्रक्रियेसाठी शासनाने आणि एमपीएससीने एक वर्षाचा विहित कालावधी नेमून दिलेला आहे. परंतू लॉकडाऊनमुळे या नियुक्त्यांच्या प्रक्रियेत खंड पडला आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नियुक्त्यांपासून वंचित राहिले. लॉकडाऊनमुळे नियुक्त्यांची ही प्रक्रिया प्रशासनाला एक वर्षात पूर्ण करता आली नाही आणि आता मात्र वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या नियमांवर बोट ठेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्त्यांपासून रोखलेले आहे, असे उमेदवारांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे वाया गेलेला कालावधी हा नियुक्ती प्रक्रियेच्या कालावधीमध्ये मोजू नये आणि प्रलंबित नियुक्त्या पूर्ण करण्यासाठी शासनाने संबंधित विभागांना मुदतवाढ देण्याचे आदेश द्यावेत. अशी मुख्य मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना दिलेले आहे. परंतू त्याची अजूनही शासन दरबारी दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहचवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर 'लॉकडाऊन नियुक्त्या' या नावाने हॅशटॅग मोहीम चालू केली असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
चौकट
सुमारे ३३४ उमेदवार नियुक्त्यांपासून वंचित
१. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१७ - ४७
२. कनिष्ठ लेखापाल/लेखापरीक्षक/लिपिक परीक्षा २०१९ - १३२
३. ग्रंथपाल आदिवासी विभाग परीक्षा २०१९ - ०४
४. लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी)/कर सहायक/एक्साईज पोलीस इन्स्पेक्टर संयुक्त परीक्षा २०१८- १५२ (लिपिक टंकलेखक)