बारामतीत लॉकडाऊन झाला शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:02+5:302021-05-19T04:12:02+5:30
बारामती : शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. मंगळवारी (दि. ...
बारामती : शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. मंगळवारी (दि. १८) प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेश जाहीर केला. त्यानुसार आता बुधवार (दि. १९) पासून किराणा, भाजीपाला, फळे, दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
१९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये दवाखाने व औषध दुकाने पूर्वीप्रमाणेच २४ तास खुुली राहतील. तर सकाळी ७ ते ११ दरम्यान, फळे व भाजीपाला, गॅस वितरण, दूध वितरण, माॅन्सूनपूर्व कामे, पाणीपुरवठा कामे, कृषी व कृषिसलग्न व्यवसाय, पशुखाद्य दुकाने सुरू राहणार असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच हॉटेल पार्सल सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय गेल्या १४ दिवसांपासून बंद असलेले बँकेचे कामकाज पूर्ववत होणार आहे. अन्य व्यवसाय मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात घटण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी ३५० ते ४०० प्रतिदिन आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या आता सरासरी २०० ते २५० दरम्यान पोहचली आहे. आजअखेर शहर तालुक्यात एकूण २२ हजार ५०१ रुग्ण आढळले आहेत. तर १८ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
कोट
...छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजी
गेल्या ४५ दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद आहेत. त्या सर्वसामान्य दुकानदारांचे कंबरडे मोडले आहेत. सर्व व्यावसायिकांना बँकेचे व्याज, कामगारांचे पगार देणार कोठून? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.
- नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ
————————————