बीडमध्ये लॉकडाऊन; ३ लाख ऊसतोडणी कामगार जिल्ह्याबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:09+5:302021-03-26T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले ३ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले ३ लाख कामगार जिल्ह्याबाहेरच अडकून राहणार आहेत. त्यांना घरी परतण्यासाठी विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी ऊसतोडणी कामगार संघटनांनी केली आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी कामगार संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांनी सांगितले की, जिल्ह्यातून ५ लाख मजूर साखर कारखाना गाळप हंगामात जिल्ह्याबाहेर जातात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या राज्यांमध्येही बीडमधील कामगार आहेत. आता गाळप हंगाम पूर्ण होत आला आहे. कामगारांची घरी परतण्याची वेळ झाली आहे आणि इकडे लॉकडाऊन जाहीर झाला आहे.
या गरीब कामगारांना आता प्रशासन जिल्ह्याच्या सीमांवरच अडवेल. त्यांना बाहेरून आलात म्हणून प्रवेश दिला जाणार नाही. चार महिने कष्टाचे काम करून घरी परत येणाऱ्यांना अशी वागणूक देणे माणुसकीला धरून होणार नाही. प्रशासन त्यांना त्रास देईल. विलगीकरणाचा आग्रह धरेल व कष्टाने केलेली त्यांची कमाई त्यातच खर्च होईल अशी भीती राठोड यांनी व्यक्त केली.
बरेच कामगार परत आले आहेत, मात्र आता सगळीकडचाच गाळप हंगाम संपत आल्याने परतणाऱ्या कामगारांची संख्या फार मोठी असेल. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वेगळा निर्णय घ्यावा, काम करत असताना या कामगारांमुळे कोणाला कोरोनाचा त्रास झाला, असे एकही उदाहरण एकाही कारखान्यावर नाही असे राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जगताप यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.