शहरात लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने शिथिल - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:11+5:302021-05-28T04:10:11+5:30
पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव घेता, शहरात लॉकडाऊन शिथिल करताना ते टप्प्या-टप्प्यानेच केले जाईल़. ...
पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव घेता, शहरात लॉकडाऊन शिथिल करताना ते टप्प्या-टप्प्यानेच केले जाईल़. तसेच, आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी व्यापारी संघटनांशी चर्चा करून मध्यममार्ग काढला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले़
शहरातील कोरोनाबाधित आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी संघटनांकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर मोहोेळ यांना विचारले असता त्यांनी, अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा लागणार असून, शनिवार आणि रविवारी सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणावी लागणार आहे.
तिसऱ्या लाटेचा धोकाही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना सर्व गोष्टींचा विचार करून मध्यम मार्ग काढावा लागणार आहे. लागलीच लग्न समारंभ, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देणे धोक्याचे आहे़ जेथे गर्दी होऊ शकते, तेथे निर्बंध आवश्यकच असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले़
----------------------------