" पुणे शहरात सध्या तरी लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोनचा विचार नाही, पण..."; महापौर मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:33 PM2021-02-17T19:33:14+5:302021-02-17T19:55:33+5:30
पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली देखील सुरु केल्या आहेत.
पुणे : पुण्यातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या सर्वच नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या परत एकदा वाढू लागल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली देखील सुरु केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांवर कडक निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सध्या तरी लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही पण पुणेकरांनी कोरोना निर्बंधांचे पालन केले आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
पुण्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील वारजे, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, नगर रस्ता या चार भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण शहरातील महापालिकेची कोरोना हॉस्पिटल व आरोग्य यंत्रणा देखील सक्षमपणे कार्यान्वित आहे. मात्र प्रमुख हॉस्पिटल असलेल्या जहांगीर, दीनानाथ मंगेशकर,रुबी हॉल अशा काही रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे. पण कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात टेस्टिंग वाढवण्यावर भर येणार आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण पुढील काळात आपल्याला लॉकडाऊन, मायक्रो कंटेन्मेंट झोन यांसारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आजमितीला 1300 वरुन 1700 वर पोहचली आहे.
शहरात आजमितीला पॉझिटिव्ह रेट 4.6 वरुन 12 वर झाला आहे.तसेच विविध ठिकाणी 17 स्वाब सेंटर देखील सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे तिथे स्वाब सेंटर वाढवणार आहे.आगामी काळात महापालिका टेस्टिंग वाढवणार आहे. तसेच शहरात बेड्सची संख्या मुबलक आहेत. सरकारी यंत्रणातील नायडू, बाणेर,ससून रुग्णालयात 1163 बेड उपलब्ध असून खासगी रुग्णालयात 3 हजार बेडस उपलब्ध आहेत. मास्क संदर्भात कारवाई कडक करण्याच्या सूचना पोलीस विभागाला करणार आहे. चिंता करण्याचे कारण नाही मात्र पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.