प्रादुर्भाव कमी होत असताना लॉकडाऊन नुकसान करणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:56+5:302021-05-12T04:09:56+5:30
तालुक्यात दि. ११ मे ते १७ मे सात दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करून प्रशासनाने शेतकऱ्यांची गळचेपी केली आहे. शेती व ...
तालुक्यात दि. ११ मे ते १७ मे सात दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करून प्रशासनाने शेतकऱ्यांची गळचेपी केली आहे. शेती व शेतीविषयक कामांशी संबंधित औषधे, बी-बियाणे खते, अवजारे यांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच उत्पादित फळे, फुले व भाजीपाला, आडते दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे उत्पादित मालांचे नुकसान होणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बँकांचे कामकाजही ग्राहकांसाठी या आदेशाने बंद ठेवण्यात आल्याने शेती व पूरक व्यावसायासाठी कर्जपुरवठा ठप्प होणार आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा शेतकरी मोठा अडचणीत आला आहे.
प्रशासनाने किमान काही तासांचा कालावधी देऊन दुकाने व बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो रुपयांचा फळे व भाजीपाला या लॉकडाऊनमुळे कुठे विकायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागत आहे. विक्रीसाठी आलेला लाखो रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना अखेर तो फेकून द्यावा लागणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हा निर्णय पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे. एकीकडे राज्यात मोफत रेशन धान्य वाटप करण्यात शासन सांगत आहे, मात्र रोजगार बंद असलेल्या सर्वसामान्य लोकांना रेशन दुकानेही बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत कळस येथील बँकेत चौकशी केली असता, ग्राहकांसाठी बँका बंद आहेत असे सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. सर्व बँका या कालावधीत ग्राहकांसाठी बंद असणार आहेत. त्याचप्रमाणे रेशन दुकानेही बंद राहतील. नागरिकांनी सात दिवसांच्या कालावधीकरिता घरीच थांबून सहकार्य करावे.
अनिल ठोंबरे, तहसीलदार, इंदापूर