लॉकडाऊन आवडे सरकारला : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:11+5:302021-07-30T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “बाहेरच्या राज्यांमध्ये सगळे सुरू आहे. तर महाराष्ट्रात का नाही,” असा प्रश्न उपस्थित करून मनसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “बाहेरच्या राज्यांमध्ये सगळे सुरू आहे. तर महाराष्ट्रात का नाही,” असा प्रश्न उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारला धारेवर धरले. “यांना लॉकडाऊन करायला काय जातंय? लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का? सरकारने सतत लॉकडाऊन वाढवत न्यायचा आणि आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत, असे होऊ शकत नाही. ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी सध्याची अवस्था झाली आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
गुरुवारी (दि. २९) त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लोकांचे उद्योग बंद झाले आहेत. सरकारने आता आणखी थोडी शिथिलता देण्याची गरज आहे.
“कोरोनाची साथ एकाएकी जाणार नसल्याचे जगातल्या तज्ज्ञांचे मत आहे. यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीत अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसते असे की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सुचत नाही,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
“महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन करेल,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुणे पालिका निवडणूक तयारीनिशी
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक जोरदार तयारीनिशी लढवणार असून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. “महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने काय केले याची पोलखोल करा,” असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रत्येक भागाची माहिती काढून ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
चौकट
वैयक्तिक वैर कुणाशी नाही
“माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. नरेंद्र मोदींच्या, अमित शहांच्या भूमिका मला पटत नाहीत तर त्या नाही पटल्या असं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या असंही मी सांगितलं आहे. स्पष्ट बोलण्यात चुकीचे काय,” असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले, “माझ्या भूमिका स्पष्टच आहेत. परप्रांतीयांनी भूमिपुत्रांवर अतिक्रमण करू नये आणि स्थानिकांनी परप्रांतीयांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे.”
चौकट
राज ठाकरे म्हणाले...
-मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना घरून काम करणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो. लोकल बंद असल्याने मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोग अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद याने नेमके काय साध्य होणार?
चौकट
‘...त्या क्लिपवरून सूत जुळवू नका’
परप्रांतीयांबद्दलची मनसेची भूमिका मनसे आणि भाजपमधील युतीत अडथळा ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यावर राज म्हणाले “चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर मी याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणारी एक लिंक पाठवेन, असे त्यांना सांगितले. मात्र अजून तरी मी त्यांना क्लिप पाठवलेली नाही. तुम्ही त्या क्लिपवरून सूत जुळवू नका.”