लॉकडाऊनमुळे महागाईला तडका, गॅस दरवाढीने उडाला भडका (डमी 874)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:55+5:302021-07-04T04:07:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्च महिन्यात तब्बल तीन वेळा घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय गृहिणींच्या तोंडचे पाणी ...

Lockdown hits inflation, gas prices skyrocket (dummy 874) | लॉकडाऊनमुळे महागाईला तडका, गॅस दरवाढीने उडाला भडका (डमी 874)

लॉकडाऊनमुळे महागाईला तडका, गॅस दरवाढीने उडाला भडका (डमी 874)

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्च महिन्यात तब्बल तीन वेळा घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले होते. एप्रिलमध्ये निवडणुकांमुळे गॅस दरात कपात करण्यात आली. एप्रिल ते जूनपर्यंत गॅस सिलिंडरचे दर काहीसे स्थिर राहिल्याने गृहिणींना थोडाफार का होईना दिलासा मिळाला. मात्र पुन्हा १ जुलैला सिलेंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाल्याने मध्यमवर्गीय गृहिणींचे मासिक अंदाजपत्रक कोलमडले आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे त्यांच्या मासिक खर्चात आधीच २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गृहिणींसमोर या वाढत्या महागाईला तोंड द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका कुटुंबाचा विचार केला तर कुटुंबात किमान चार ते पाच व्यक्ती असतात. त्याअनुसार दर महिना लागणा-या जीवनावश्यक वस्तुंच्या खर्चासाठी लागणा-या रकमेचे गृहिणी अंदाजपत्रक तयार करीत असतात. नवीन वर्षातच गृहिणींना गॅस दरवाढीने जोरदार दणका दिल्याने त्यांचे अंदाजपत्रकच पूर्णत: कोलमडून गेले आहे. पूर्वी गॅस सिलिंडरवर विशिष्ट सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा केली जायची. मात्र आता ती देखील बंद झाल्याने चढ्या भावानेच गॅस सिलिंडर खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. जानेवारीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर हा ६९७ रुपये इतका होता. फेब्रुवारीअखेरर्यंत हा दर ७९७ रुपयांपर्यंत पोहोचला. मार्चमध्ये ८२२ रुपये मोजावे लागले आणि तीन महिन्यांत ८१२ पर्यंत स्थिर राहिलेल्या दरात पुन्हा २५ रुपयांची वाढ होऊन आता एका गॅससाठी ८३७.५० पैसे मोजण्याची वेळ आली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरचा दर १४७३ रुपये झाला आहे. या वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असून, सांगा जगायचं कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

--------------------------------------------------------------

दोन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचा दर हा ४०० रुपये होता. आता त्याची किंमत ही ८३७ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एका कुटुंबाकडे किमान २ गॅस सिलिंडर असतात, हे गृहीत धरले तर वाढत्या किमतीनुसार त्याची किंमत ही १६०० रुपयांच्या घरात जाते. याबरोबर भाजीपाला, दूधसह इतर जीवनावश्यक वस्तुंच्या वाढीचा सामना करावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या तारखेला जे अंदाजपत्रक ठरवू ते तसेच असेल, असे सांगता येत नाही. त्याच्यामध्ये वाढच झालेली पाहायला मिळते.

- अमृता देशपांडे, गृहिणी

--------------------------------------------------------------

लॉकडाऊन काळात घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे कुटुंबाव्यतिरिक्त व्यवसायासाठीही दोन गॅस सिलिंडर अतिरिक्त लागत आहे. घरगुती गॅससाठी ८३७ रुपये तर व्यावसायिकसाठी १५५० रुपये मोजावे लागणार आहेत. व्यवसायातून अजून म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नाही, पण खर्च मात्र वाढत चालला आहे. महिन्याच्या अखेरीस हातात काहीच पैसे राहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

- गायत्री सोमण, गृहिणी आणि व्यावसायिक

--------------------------------------------------------------

एप्रिलमध्ये निवडणुकांमुळे गॅस सिलिंडरच्या किमती उतरल्या. त्या जूनपर्यंत स्थिर राहिल्या. जुलै महिन्यात बाजारमूल्यात वाढ झाल्याने दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भविष्यात गॅस सिलेंडरच्या वाढच होण्याची शक्यता आहे. ओएनजीसीनुसार डिसेंबरपर्यंत ६० टक्क्यापर्यंत दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने गॅस सिलिंडरवरची सबसिडी बंद केली आहे. याचा मध्यमवर्गीयांना नक्कीच फटका बसला आहे.

- एचपी गॅस वितरक

----------------------------

असे वाढले सिलेंडरचे दर (रुपये)

महिना घरगुती (१४ किलो) व्यावसायिक (१९ किलो)

2020

आॅगस्ट 597 1136.50

सप्टेंबर 597 1134.50

आॅक्टोबर 597 1368

नोव्हेंबर 597 1236

डिसेंबर 647 1327

2021

जानेवारी 697 1343.50

फेब्रुवारी 797 1534

मार्च 822 1610

एप्रिल 812 1640.50

मे 812 1625

जून 812 1473

जुलै 837.50 1550

Web Title: Lockdown hits inflation, gas prices skyrocket (dummy 874)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.