‘लॉकडाऊन’ उठताच वाढली भटक्या श्वानांची ‘दहशत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:48+5:302020-12-17T04:38:48+5:30
पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल होताच भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांची दरवर्षी ...
पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल होताच भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नसबंदी केली जाते. परंतु, तरीदेखील शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु, तरीही नागरिकांचा त्रास मात्र कमी झालेला नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट पसरली असून किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखाच्या घरात पोहोचली असून, सन २०१८ सालात शहरातील नऊ हजारांहून अधिक नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पसरलेला कचरा आणि खाद्यपदार्थ यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढत चालली आहे. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण ७०० ते ८०० नागरिकांना कुत्री चावत असल्याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गेल्या काही वर्षात वाढलेले हे प्रमाण कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अत्यंत कमी झाले आहे. २०१९ सालात अवघ्या ७५० घटनांची नोंद करण्यात आली आहे. नागरिक बाहेर पडत नसल्याने कुत्रा चावण्याच्या घटना कमी झाल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
====
वर्ष घटना
२०१७ १० हजार ३४०
२०१८ ९ हजार १३४
२०१९ ७५०
====
नागरिकांकडून तक्रार आल्यास आरोग्य निरीक्षक भटकी कुत्री पकडून त्यांना डॉ. नायडू रुग्णालय किंवा मुंढव्यातील केंद्रामध्ये दाखल करतात. प्राणी संख्या नियंत्रण नियमांतर्गत (अॅनिमल बर्थ कंट्रोल रुल) त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांना अँटी रेबीज लसही दिली जाते. तीन दिवसांनंतर ज्या भागातून कुत्री पकडण्यात आली होती; तेथेच पुन्हा सोडण्यात येतात. दरमहा हजार ते दिड हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. कुत्री पकडण्यासाठी पालिके ची पाच आणि ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे या संस्थेच्या पाच अशा एकूण दहा गाड्या आहेत.
- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, व्हेटरनरी विभाग, पुणे महापालिका
====
खाद्यपदार्थांच्या गाड्या, चायनीज, नॉन व्हेज हॉटेल्स, चिकन-मटणाची दुकाने आदींच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. रात्रीच्या वेळी जाणा-या पादचारी तसेच वाहनचालकांच्या मागे ही कुत्री लागतात. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उपनगरे, नवीन समाविष्ठ गावे आणि मध्यवस्तीतही ही समस्या पहायला मिळते आहे.
====
भटकी कुत्री पकडण्यात आल्यानंतर त्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जाते. त्यानंतर ही कुत्री पुन्हा ज्या भागातून पकडण्यात आली होती; त्याच भागात पुन्हा सोडण्यात येतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होतच नाही.
====
मी रात्रीच्यावेळी कामावरुन घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले भटके कुत्रे धावत पायाजवळ आले. त्याला वाचविण्याच्या नादात आणि मला त्याने चावा घेऊ नये या भितीमध्ये माझा गाडीवरील ताबा सुटला. मी गाडीसह रस्त्यावर पडल्याने मला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्यांवरच्या भटक्या कु त्र्यांबद्दल मला आणखीनच भिती मनात बसली. या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.
- मनोज केदारे, नागरिक