बसमधून ५५ ग्रॅम सोने लंपास
By admin | Published: January 25, 2017 11:42 PM2017-01-25T23:42:50+5:302017-01-25T23:42:50+5:30
पुणे (स्वारगेट) ते अक्कलकोट एसटी बसमध्ये विवाहितेचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास
भिगवण : पुणे (स्वारगेट) ते अक्कलकोट एसटी बसमध्ये विवाहितेचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना डाळज येथे या ठिकाणी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील शीतल संदेश मखरे ही विवाहिता आपली सासू शालन सुभाष मखरे यांच्यासोबत इंदापूरहून भिगवणकडे येणाऱ्या स्वारगेट-अक्कलकोट (एमएच १४-बीटी ३१४५) या बसने प्रवास करीत होत्या. त्यांच्यासोबत असणाऱ्या बॅगमध्ये सोन्याचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज होता. बस पुणे-सोलापूर महामार्गावरील अधिकृत थांबा असणाऱ्या देवा फूड या ठिकाणी जेवणासाठी थांबून पुण्याकडे निघाली असता त्यांची चोरी झाल्याचे शीतल यांच्या लक्षात आले. त्यांनी बस वाहकाला ही बाब सांगितल्याने तातडीने बस भिगवण पोलीस ठाण्यात नेण्यात आली. या ठिकाणी दोन महिला पोलिसांनी बसमधील प्रवाशाची झडती घेतली असता, कोणतीही वस्तू सापडली नाही. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी बसमधील सर्व प्रवाशांची नावे आणि मोबाईल नंबर नोंद करून बस मार्गस्थ केली. याबाबत शीतल संदेश मखरे यांनी फिर्याद दिली असून, त्याचा तपास पोलीस तात्यासाहेब ढवळे, धनंजय राऊत, श्रीरंग शिंदे, महिला पोलीस शिपाई लता हिंगणे व उज्ज्वला गवळी करीत आहेत.(वार्ताहर)