लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणास येणार वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:38 PM2018-09-01T21:38:18+5:302018-09-01T21:39:19+5:30
लोहगाव विमानतळाच्या बहुप्रतिक्षित नवीन टर्मिनल इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या इमारतीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील ३० महिन्यात हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.
पुणे : लोहगावविमानतळाच्या बहुप्रतिक्षित नवीन टर्मिनल इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या इमारतीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील ३० महिन्यात हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. ही इमारती पुर्ण झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता प्रति वर्षी २ कोटींवर पोहचणार आहे.
लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या वर्षअखेरपर्यंत एक कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या टर्मिनल इमारतीला खुप मर्यादा आहेत. त्यामुळे विमान उड्डाणे वाढविणे शक्य होत नाही. त्याअनुषंगाने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पावले उचलली जात आहे. याअंतर्गत काही महिन्यांपासून नवीन टर्मिनल इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया दि. ३१ आॅगस्ट रोजी पुर्ण झाली आहे.
खासदार अनिल शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन एकात्मिक टर्मिनल ची निविदा दि. ३१ आॅगस्ट रोजी मंजूर झाली आहे. ‘आयटीडी’ सेमेन्टेशन इंडिया लिमिटेड या कंपनीची निविदा सर्वात कमी ठरली आहे. एकुण आठ कंपन्यांमध्ये त्यांची ३५८.८९ कोटी रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. हे काम आगामी ३० महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल च्या कामास गती मिळणार असून त्याच्या निर्मिती मुळे विमानतळ पूर्ण क्षमतेने चालन्यास मद्त होणार असल्याचे मत शिरोळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्र सुमारे ४२ हजार चौरस मीटर असून सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीमध्ये प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. तसेच ही इमारत पर्यावरणपुरक राहणार असेल. इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर प्रति वर्षी सुमारे २ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे पुण्याच्यादृष्टीने या इमारतीचे काम लवकरात लवकर पुर्ण होणे महत्वाचे आहे.