लोहगाव ग्रामपंचायत : २७ लाख ९० हजारांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:29 AM2017-08-10T02:29:12+5:302017-08-10T02:29:12+5:30
लोहगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवक आणि सदस्यांवर शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पुणे : लोहगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवक आणि सदस्यांवर शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रापंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये २७ लाख ९० हजारांची अफरातफर करण्यात आली आहे. यासाठी तत्कालीन सरपंच सोनाली भुकण, दीपक मोझे, प्रितम खांदवे, संतोष खांदवे, सोमनाथ खांदवे, संतोष कुंभार, रावसाहेब राखपसरे, सोनम काळभोर, श्वेता काळे, सुजाता ओव्हाळ, ग्रामसेवक एस. व्ही. लांडगे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
बाजारकर हे ग्रामपंचायतीचे स्व:उत्पन्नाचे साधन आहे. तसेच दरवर्षी बाजार लिलाव होणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदारास रितसर पत्र देऊन बाजारकर वसुलीचा ठेको देणे तसेच त्यासाठी अटी-शर्तीचा करारनामा प्रक्रिया केल्या नाहीत. ग्रामपंचायत लोहगाव यांच्यावतीने बेकायदेशीर ठराव करून बाजारकर वसुली डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ अखेरपर्यंत संत तुकाराम महाराज ट्रस्टकडे जाणीवपूर्वक दिली. ट्रस्टने वसुल केलेली रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा करणे अपेक्षित असताना अशी प्रक्रिया न करता त्यामध्ये अपहार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तत्कालीन सरंपच, ग्रामसेवक आणि काही सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.
लोहगाव ग्रामपंचायत हद्दतील बाजार कर वसुलीसाठी संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला वसुलीचे अधिकार बेकायदेशिरत्या दिले होते. बाजार कराची रक्कम ग्रामपंचायतीस न मिळता ट्रस्टकडे जमा होत होती. ग्रामपंचयात ठराव क्रमांक ९३/६ दोन फेबु्रवारी २०१३ मध्ये बाजार कर वसुलीचे अधिकार जगदगुरू श्री संत तुकाराम मंदीर अजोळ ट्रस्ट यांना द्यावे असा ठराव सवार्नुमते करण्यात आला होता. सन २०१२-१३ आर्थिक वर्षासाठी बाजरकराचा ठेका देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. तसेच त्याचा रितसर करारनामा करण्यात आला नव्हता. तर ग्रामपंचायतीचा ठेका रद्द केलेला आणि ट्रस्टकडे बाजारकर देण्यासंदर्भात ठेकेदाराला लेखी कळविण्यात आले नाही.
सन २०१२-१३ मधील बाजारकर ग्रामपंचायत भरणा करावयाचे ९ लाख रकमेचा ठेका ठेकेदार गुलाब धोेंडिबा मोडक यांना देण्यात आला होता. त्यापैकी त्यांनी ५ लाख रुपयांचा भरणा त्यांनी ग्रामपंचायतीला धनादेशाद्वारे केला आहे. तर उर्वरित बाजार कर वसुली मोडक यांनी दिलेल्या जबाबावरुन ट्रस्टचे चेअरमन प्रताप खांदवे यांच्या सांगण्यावरून ४ लाख ट्रस्टकडे जमा करण्यात आले. ठेकेदार मोडक यांनी सन २०१३-१४ मध्ये बाजारकर वसुलीचे ११ लाख सन २०१४-१५ मधील १३ लाखांचा करार करण्यात आला होता. त्यापैकी २३ लाख ९० हजार ट्रस्टकडे जमा करण्यात आले. तर मोडक यांनी २०१२-१३ मध्ये ट्रस्टला ४ लाख रुपये जमा केले होते. असे मिळून २७ लाख ९० हजार रुपये ट्रस्टकडे जमा केले होते.
पैसे ट्रस्टकडे जमा केल्याची कोणतीही नोंद नाही
गैरव्यवहारामध्ये ग्रामविकास अधिकारी लोेहगाव यांनी बाजार कर गोळा करण्यासाठी ठेकेदार मोडक यांना दिलेल्या आदेशाची प्रत दफ्तरी आढळून आली नाही. तसेच बाजारकरासाठी देण्यात आलेली २७ लाख ९० हजारांची रक्कम ट्रस्टकडे जमा केल्याची कोणतीही नोंद आढळून आली नाही. सध्या ही रक्कम कोणाकडे आहे याची खातरजमा करता येत नसल्याचे जिल्हा प्रशानाने गटविकास अधिकाºयांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे.