लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:33 PM2021-01-31T20:33:45+5:302021-01-31T20:34:44+5:30
lohegaon airport : सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत.
पुणे : लोहगाव विमानतळावरील धावपट्टीवरील रिसरफेन्सिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे २०२१ मध्ये १४ दिवस विमानसेवा बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुणेविमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत. इंडियन एअर फोर्सला याबाबत विमान प्राधिकरणाने माहिती दिली आहे. पुणे विमानतळ हा सरंक्षण खात्याच्या मालकीचा जागेवर असून भारतीय हवाई दलासाठी प्रामुख्याने या विमानतळाचा वापर केला जातो. गेल्या वर्षी २६ ऑक्टोंबरपासून विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, लोहगाव विमानतळावर २६ एप्रिल ते ९ मे २०२१ असे १४ दिवस धावपट्टीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पुणे येथील विमानतळावरील विमान सेवा बंद राहणार असल्याचे पुणे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे आगाऊ विमान तिकीट काढण्यापूर्वी पुणे लोहगाव विमानतळ बंद असलेल्या तारखा प्रवाशांनी लक्षात घ्याव्यात.