चुकीच्या मीटर रीडिंगमुळे लोहगाव-धानोरीकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:22+5:302021-07-29T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मीटरनुसार वीज बिलांची आकारणी न करणे, चुकीची बिले देणे, मीटर रीडिंग घ्यायलाच कोणी न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मीटरनुसार वीज बिलांची आकारणी न करणे, चुकीची बिले देणे, मीटर रीडिंग घ्यायलाच कोणी न येणे, या कारणांमुळे लोहगाव-धानोरीतील वीज ग्राहक हैराण झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महावितरणच्या विश्रांतवाडी उपविभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार दिली आहे.
नगररोड विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव आणि विश्रांतवाडी उपविभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रृती रोडे यांनी तक्रार अर्ज स्वीकारला.
संघटनेचे वडगावशेरी मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष सागर खांदवे यांनी सांगितले की, लोहगाव धानोरीतील अनेकांचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्याच्या कारणावरून बंद करण्यात आला आहे. संतनगर, योजनानगर, पवारवस्ती, हरणतळ वस्ती, पाटील वस्ती, खंडोबा माळ या भागातील वीज ग्राहकांना कित्येक दिवसांपासून वीज बिल मिळालेले नाही. प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेताच, जागेवर जाऊन फोटो न काढताच अंदाजे वीज बिले तयार करण्यात आली आहेत. पुढच्या वेळी रीडिंग घेऊन वीज बिल दुरुस्ती होईल, असे सांगत लोकांना चुकीची बिले भरण्यास भाग पाडले गेले.
चुकीच्या वीज बिलांच्या आधारे सामान्य ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्गाला आतोनात त्रास सहन करावा लागत आहे. चुकीची बिले सादर करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी तसेच या बिलांच्या आधारे वीजजोड खंडित करू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. संघटनेचे सुनील कमद, अनिल साळुंखे, मनोज ठोकळ, कुलदीप घोडके, रूपेश घोलप, महेश राजगुरू आदींनी तक्रार अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
चौकट
खोटारड्या ठेकेदाराच्या पाठीशी कोण?
वीज मीटर रीडिंगचे काम करणारी संस्था महावितरणच्याच बिलिंग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच संबंधित कंपनीच्या ढिसाळ कारभारानंतर आणि वीज ग्राहकांच्या वारंवार तक्रारी आल्यानंतरही याच कंपनीकडून महावितरण काम करून घेत आहे. प्रत्यक्षात ग्राहकांना आलेली चुकीची बिलेही दुरुस्त झाली नाहीत, ना चुकीची बिले देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली. त्यामुळे या खोटे काम करणाऱ्या कंपनीवर कोणाचा वरदहस्त आहे. यावरून नागरिकांमध्ये संताप आहे.
चौकट
न सुधारल्यास कारवाई
संबंधित ठेकेदाराविरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्याने त्यांना नोटीस दिली आहे. त्यांची कामगिरी न सुधारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच लोहगाव-धानोरी भागातील ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता या भागासाठी नवीन शाखा कार्यालयाचाही प्रस्ताव दिला आहे. यामुळे नागरिकांना सुविधा देणे सोईचे होईल.
-अशोक जाधव, कार्यकारी अभियंता, नगर रस्ता विभाग, महावितरण