Lok Sabha Election 2019: बारामतीत यंदा त्रिकोणी लढत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 02:08 AM2019-03-12T02:08:18+5:302019-03-12T02:08:40+5:30

भाजपा कमळ, तर जानकर यांचा कपबशीवर लढण्याचा हट्ट कायम

Lok Sabha Election 2019: Baramati struggles this time triangle? | Lok Sabha Election 2019: बारामतीत यंदा त्रिकोणी लढत?

Lok Sabha Election 2019: बारामतीत यंदा त्रिकोणी लढत?

Next

- प्रशांत ननवरे

बारामती : माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (दि. ११) जाहीर केले. ‘साहेबां’च्या माघारीनंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातील ‘त्रिकोणा’वर शिक्कामोर्तब झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपाचाच उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यातच केली आहे. दुसरीकडे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनीदेखील याच लोकसभा मतदारसंघातून कपबशीच्या चिन्हावर लोकसभा लढविण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. त्यामुळे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत यंदा त्रांगडे होणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच भाजपाच्या चेहऱ्याबाबत उत्सुकता ताणली आहे.

अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलले आहे. मागील महिन्यात बुथ कार्यकर्ता बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघाबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट केली. बारामतीत भाजपाचाच उमेदवार लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मंत्री जानकर यांनी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे अथवा थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात माढ्यात निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, बारामतीतूनच निवडणूक लढविण्यावर जानकर यांचा अधिक कल होता, आजही आहे. रासपच्या कार्यकर्त्यांचादेखील तसा आग्रह आहे.

महिला उमेदवाराच्या विरोधात महिला?
बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या विरोधातदेखील महिला उमेदवार देण्याच्या भाजपाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर दौंडचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. शिवाय बारामतीतून लोकसभेसाठी भाजपामधून बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, भीमराव तापकीर, वासुदेव काळे यांची नावे चर्चेत आहेत.
कुल यांना उमेदवारी देण्यासाठी आमदार कुल यांना रासपला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कुल यांच्या राजकीय निर्णयाचीदेखील उत्सुकता आहे. तिहेरी निवडणूक कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबतदेखील राजकीय चर्चा रंगली आहे.

...पुण्यात आज शेट्टी-जानकरांची बैठक
एकेकाळी भाजपा-सेना युतीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी फारकत घेतली. भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकेची झोड खासदार शेट्टी यांनी उठवली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा होते. मात्र, मंगळवारी (दि. १२) पुणे शहरात खासदार शेट्टी यांच्यासमवेत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची बैठक होणार आहे. भाजपाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शेट्टी-जानकर भेट महत्त्वाची मानली जात आहे.

ही बैठक मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी मानली जात आहे. मागील वर्षी भाजपा-शिवसेनासमवेत मित्रपक्षाची भूमिका बजावणारे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष नेमकी यंदा कोणती भूमिका घेतात, यावर बरीच गणिते अवलंंबून आहेत. याच बैठकीत जानकर यांच्या बारामतीच्या लढतीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Baramati struggles this time triangle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.