Lok Sabha Election 2024: खेडच्या पूर्व भागात शांततेत मतदान; मात्र मतदानाचा टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:04 PM2024-05-13T17:04:58+5:302024-05-13T17:05:59+5:30
शेलपिंपळगाव व आळंदी मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारराजा मतदानासाठी दाखल झाला होता....
आळंदी/शेलपिंपळगाव (पुणे) : लोकसभा निवडणूक रणधुमाळी जोरात सुरू असून सोमवारी (दि.१३) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. शिरुर लोकसभा मतदार संघात सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. खेडच्या पूर्व भागातील आळंदी शहारासह शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी, कोयाळी - भानोबाची, मरकळ, गोलेगाव, वडगाव - घेनंद, केळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, भोसे, काळूस, रासे, कडाचीवाडी, चिंचोशी, धानोरे, सिद्धेगव्हाण आदी गावांत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
शेलपिंपळगाव व आळंदी मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारराजा मतदानासाठी दाखल झाला होता. शेलपिंपळगाव केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, काही गावांमध्ये सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानाला पाठ फिरविली. दुपारी बारानंतर काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यंदा मतदानाची आकडेवारी घटलेली दिसून आली. बहुतांश गावांत दुपारी बारा वाजेपर्यंत अवघे १५ ते १७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. कोयाळी - भानोबाची येथे दुपारी दोन वाजेपर्यंत ३५ टक्के तर बहुळ येथे ३० टक्के तर सिद्धेगव्हाण येथे ४० टक्के मतदान झाले होते.
आळंदी शहरात सकळच्या सत्रात काही केंद्रांवर मतदानासाठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी तीन वाजेपर्यंत आळंदी शहरात ३५ टक्के मतदान झाले होते. मात्र, शहरातही अनेक मतदारांनी मतदानाला पाठ फिरविल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे कमी टक्केवारीचा फायदा कोणाला होईल, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, शेलपिंपळगाव येथे सीआरएफच्या स्पेशल जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार दिलीप मोहितेंनी बजावला मतदानाचा हक्क
राजकीय नेत्यांबरोबरच तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिकही मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. शेलपिंपळगाव येथे सकाळी दहाच्या सुमारास खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तर बहुळ येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मतदान केले.
Pune: खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला#dilipmohitepatil#shirurpic.twitter.com/MGdnuZhOFW
— Lokmat (@lokmat) May 13, 2024