Lok Sabha Election 2024: नेत्यांच्या ‘नॉन शेड्यूल’ विमानामुळे पुणे विमानतळावर ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:52 IST2024-04-27T11:51:55+5:302024-04-27T11:52:31+5:30
गेल्या दहा दिवसांत पुणे विमानतळावर ५०हून अधिक ‘नॉन शेड्यूल’ विमानांची वाहतूक झाली आहे....

Lok Sabha Election 2024: नेत्यांच्या ‘नॉन शेड्यूल’ विमानामुळे पुणे विमानतळावर ताण
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यासाठी राजकीय नेते खासगी विमानाचा वापर करत आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत पुणे विमानतळावर ५०हून अधिक ‘नॉन शेड्यूल’ विमानांची वाहतूक झाली आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून, येथून २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत पुणे विमानतळ आठव्या स्थानावर; तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशात नवव्या स्थानावर आहे. पुण्यातील विमान प्रवाशांची वाढ पाहता स्वतंत्र विमानतळ गरजेचाच असल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे.
देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांमध्ये (बिझी एअरपोर्ट) लोहगाव आठव्या स्थानावर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्याचे दौरे सुरू झाले आहेत. त्यासाठी राजकीय नेते खासगी विमान व हेलिकॉप्टरने प्रवासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुण्याहून ‘नॉन शेड्यूल’ विमानांची संख्या वाढली आहे. मागील १० दिवसांत पुणे विमानतळावर ५०हून अधिक ‘नॉन शेड्यूल’ विमानांची वाहतूक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सर्वाधिक खासगी विमानांचा वापर झाला आहे.