'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:55 AM2024-05-09T08:55:47+5:302024-05-09T08:59:01+5:30
Uddhav Thackeray : काही दिवसापूर्वी एका कंपनीने एका जाहिरातीमध्ये मराठी लोकांना इथं स्थान नाही असं म्हटले होते, यामुळे मोठा वाद उफाळून आला होता.
Uddhav Thackeray ( Marathi News ) पुणे- काही दिवसापूर्वी एका कंपनीने एका जाहिरातीमध्ये मराठी लोकांना इथं स्थान नाही असं म्हटले होते, यामुळे मोठा वाद उफाळून आला होता. शेवटी हे प्रकरण तापल्यानंतर याप्रकरणी त्या कंपनीच्या एचआरने माफी मागितली. दरम्यान, आता हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला आहे. काल मावळ येथील सभेत या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजराती कंपन्यांना इशारा दिला आहे.
काल महाविकास आघाडीची मावळ येथा जाहीर सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीमधील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच मराठी तरुणांच्या नोकऱ्यांवरुनही कंपन्यांना इशारा दिला. लोकसभेसाठी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, आता मुंबईतील प्रचारामध्ये मराठी तरुणांच्या नोकरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार असल्याचे दिसत आहे.
"महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेलात, हिरेव्यापार घेऊन गेलात. म्हणून मी तुम्हाला वचन दिले आहे, इंडिया आघाडीच सरकार आल्यानंतर पुन्हा उद्योगधंदे उभारु. लुटलेलं वैभव पुन्हा उभा करणार. 'दोन दिवसापूर्वी मुंबईत एक जाहीरात आली, ती गुजराती कंपनी आहे ऑनलाईन जाहीरात काढली, यात मराठी माणसांना प्रवेश नाही असं लिहिलं होतं. मी त्यांना सांगतो सगळ्या गुजरातींबद्दल माझ्या मनात आकस नाही. मी फक्त त्यांनाच सांगतो खासकरुन या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रात जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल नाहीतर तुमचसुद्धा आम्ही शटर बंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'जाहिरात व्हायरल
एका एचआर रिक्रूटरने लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या नोकरीच्या जाहीरातीमुळे सोशल मीडियावर नाराजी पसरली. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहीरात तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर शेअर केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे या जाहीरातीमध्ये एचआरने "येथे मराठी लोकांचे स्वागत नाही" असे लिहिले होते. या सगळ्या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला.