Lok Sabha Election: निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग? बारामतीच्या वकिलांची मेलद्वारे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 11:04 AM2024-05-08T11:04:10+5:302024-05-08T11:04:48+5:30
बारामती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे चिन्ह गोठवणे आवश्यक होते, पुढील उर्वरित टप्प्यांमध्ये देशात कोणत्याही उमेदवाराला सीसीटीव्ही चिन्ह देण्यात येऊ नये, अशी विनंती झेंडे पाटील यांनी केली आहे....
बारामती (पुणे) :बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत बारामती येथील ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
ॲड. झेंडे पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार, बारामती लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व प्रचार बंद असून, सर्व चिन्हे, फलक काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, एका उमेदवाराचे सीसीटीव्ही कॅमेरा चिन्हाचे बोर्ड व कॅमेरे आयोगाने मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर लावलेले आहेत. एक प्रकारे निवडणूक आयोग आदर्श आचारसंहितेचा भंग करीत आहेत.
बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवार क्रमांक ३३ शैलेंद्र ऊर्फ संदीप करंजावने यांचे निवडणूक चिन्ह सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचसारखे दिसणारे चिन्ह बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर आयोगाने प्रदर्शित केले असून, प्रत्यक्षात तसेच दिसणारे सीसीटीव्ही कॅमेरे आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बसवले आहेत. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार झेंडे पाटील यांनी केली आहे.
बारामती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे चिन्ह गोठवणे आवश्यक होते, पुढील उर्वरित टप्प्यांमध्ये देशात कोणत्याही उमेदवाराला सीसीटीव्ही चिन्ह देण्यात येऊ नये, अशी विनंती झेंडे पाटील यांनी केली आहे.