Lok sabha Election: पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:44 AM2024-04-18T11:44:02+5:302024-04-18T11:45:11+5:30
खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे....
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी (दि. १८) सुरुवात होणार आहे. त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या टप्प्यात असल्याने तेथे १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) आहे. उर्वरित पुणे, मावळ व शिरूर या तीन मतदारसंघांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल असून, अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी अर्थात २६ एप्रिलला होणार आहे. अर्ज माघारीची तारीख २९ एप्रिल आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे आणि ‘एमआयएम’कडून अनिस सुंडके यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे, महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे उध्दवसेनेतर्फे संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
यापैकी एकाही उमेदवाराकडून अद्याप अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केलेली नाही. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. मात्र, त्याची तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.