'मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ'; जानकर आक्रमक पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:33 PM2019-03-23T13:33:25+5:302019-03-23T13:49:27+5:30
'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्यावर महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केलं आहे.
पुणे - शिवसेना-भाजपा युतीत डावलल्याने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्यावर महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केलं आहे.
पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीला मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले की, सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असणार आहे. रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला.आत्तापण दोन वेळा आला.त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आजही शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे सेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या असं सांगत महादेव जानकर यांनी संध्याकाळपर्यंत थांबा.आणि मग निर्णय घेऊया असं कार्यकर्त्यांना सांगितले.
तसेच आता मंत्रिपदही नको. एकदा मांडावाखाली जाऊन आलो आहे.आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावे. सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले.होते, मी त्यांना भाजपामध्ये जा असं सांगितलं. तिथे तुम्हाला चांगले दिवस येतील असं सांगितलं.आणि तो बिचारा भाजपात गेला असा दावा महादेव जानकरांनी केला. मात्र तुमच्या चिन्हावर कसं लढणार ? तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं. चिन्ह ज्या पक्षाचा उमेदवार असतो. याला युती नाही बेकी म्हणतात. त्यामुळे आपण 30-35 वाढवलेल्या पक्षाच्या चिन्हावर जागा लढवणार असल्याचा गर्भित इशारा महादेव जानकरांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे.
आपल्याला बेदखल करण्यासाठी व्यवस्था उभारली जात आहे. असे नसेल तर काँग्रेस आणि भाजपाकडून त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह का केला जात आहे असा सवाल जानकरांनी केला. युद्धात हरलो तरी तहात जिंकावे लागेल. ही वादलापूर्वीची शांतता आहे हा पक्ष कोणाच्या मेहेरबानीवर चालत नाही. आपल्याला संयमाने काम करावे लागेल. पक्ष आणि संघटना वाढीवर भर द्यायला हवा. जातीच्या चौकटीबाहेर पडून पक्ष वाढवावा असं आवाहन जानकरांनी कार्यकर्त्यांना केले.
अजून माढा जागेबाबत आशावादी
मी अद्यापही माढा मतदार संघाची आशा सोडलेली नाही. महायुतीत जागा सोडायला तयार होते मात्र चिन्ह त्यांचे वापरण्याचा आग्रह होता. त्याला आम्ही नकार दिला आहे. प्रसंगी गुजरात मधून उमेदवार आणून राज्यसभेवर जाईन असे ते म्हणाले. मी त्यांची साथ दिली नाही तर मला बदनाम करतील अशी भीती आहे. जानकरला पद दिले नाही म्हणून बाहेर पडला असा गद्दारीचा शिक्का नको असेही जानकर म्हणाले.
जानकरांचे पंख छाटले, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी #BJPhttps://t.co/fCO5cVNqdy
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 23, 2019
दरम्यान बहीण - बहीण म्हणून मी जवळ गेलो पण कोणीही जबाबदारी घेतली नाही असा टोलाही महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला. लोकसभा निवडणुकीसाठी रासपाने भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती मात्र जानकरांच्या मागणीकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने महादेव जानकर नाराज आहे त्यामुळे महादेव जानकर यांचा रासप युतीसोबत राहणार की स्वबळावर निवडणुका लढवणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.