लोकसभा निवडणूक २०१९ - मावळमध्ये दुपारपर्यंत १८ .४ तर शिरुरला १६.२१ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:03 PM2019-04-29T13:03:33+5:302019-04-29T13:42:03+5:30
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात देशात ७१ तर महाराष्ट्रातल्या १७ मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे..
पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. यात देशात ७१ तर महाराष्ट्रातल्या १७ मतदारसंघाचा देखील समावेश आहे. राज्यात मुंबई , कल्याण ,ठाणे, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, मावळ , शिरुर, नाशिक, मुंबई, नंदुरबार , धुळे , शिर्डी, दिंडोरी, पालघर , भिवंडी, ईशान्य मुंबई,स उत्तर मुंबई, आदी मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यात मावळ मध्ये दुपारपर्यंत १८.०४ तर शिरुर येथे १६.२१ टक्के मतदान करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात सकाळी १२ वाजेपर्यंत मावळमध्ये १८.०४ टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघात सकाळी सातला मतदान सुरू झाले. काळेवाडीतील एम एम स्कुल मधील केंद्रावर मतदान यंत्र बिघाड झाला होतो. काही वेळात यंत्र दुरुस्त केले. दुपारपर्यंत मावळ मतदारसंघातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 19.78 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात पनवेल 17.13 %, कर्जत 18.75 %, उरण 16.87 %, मावळ 17.48 %, चिंचवड 19.78 %, पिंपरी 17.89 % मतदान झाले आहे.
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कुटुंब समवेत थेरगाव येथील संचेती विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सरिता, मुलगा विश्वजित आणि प्रताप बारणे उपस्थित होते. तसेच शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मावळमध्ये आमदार संजय भेगडे यांनी कुटुंबासमवेत भेगडे आळी विभागातील कैकाडी समाज मंदिर येथे सकाळी १०च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. आई कमल भेगडे,संजय भेगडे, पत्नी सारिका भेगडे यांनी मतदान केले.आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत मतदान केले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव शाळेत मतदान केले. अभिनेत्री प्रियंका यादव यांनी बिजलीनगर मतदान केंद्रावर मतदान केले. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी तळेगाव नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
पार्थ पवारांची वडगाव मतदान केंद्रावर भेट दिली. राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी येथील ज्युडन इंग्लिश हायस्कूलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी भारती साबळे, मुलगी वेणू साबळे यांनी देखील मतदान केले.
पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव येथे आपला मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी जगताप म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळेल. भाजपची सर्वत्र हवा आहे. त्यामुळे महायुतीला मोठे यश मिळेल. मावळ लोकसभा मतदारसंघात 60 ते 65 टक्के मतदान होईल, असे अंदाज यावेळी जगताप यांनी व्यक्त केला.
भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सारिका भेगडे, आई कमल भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजाविला. तळेगावदाभाडे येथील भेगडे आळी विभागातील कैकाडी समाज प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केले. शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. भोसरी, लांडेवाडी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सकाळी दहा वाजता निगडीत कुटुंबियांसह मतदान केले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात कुटुंबियासह मतदान केले.
अमित गोरखे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. मतदान करणे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडून आपला हक्क बजवावा. 100 टक्के मतदान होणे आवश्यक आहे"
.........
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क बजाविताना आनंद वाटला. देशासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपले आद्य कर्तव्य बजाविले पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त सरकार आणणे आवश्यक आहे. मजबूत सरकार आणि विकासयुक्त सरकार आले पाहिजे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मोदी यांना म्हणजेच मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान करा..- भाजपा खासदार अमर साबळे
...........