लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:55 AM2019-05-08T11:55:50+5:302019-05-08T12:04:42+5:30

काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे. 

Lok Sabha Elections: Counting Pass business in superfast | लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

Next
ठळक मुद्देवितरणाआधीच ठरतेय किंमतपुणे लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या ३१ प्रत्येक उमेदवाराला त्याचे प्रतिनिधी मतमोजणी सभागृहात आणता येतातप्रत्येक टेबलला एक प्रतिनिधी याप्रमाणे उमेदवाराला पास पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी १०२ टेबल असणार

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस जवळ येऊ लागला तसा त्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मिळणाºया पासचा बाजार तेजीत येऊ लागला आहे. प्रशासनाने अद्याप पास वितरीत केलेले नाही तरीही त्याची किंमत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आधीच निश्चित केली जात आहे. एका पासची किंमत असे न करता एकदम ठोक रक्कम ठरवण्यात येत असून त्यात मागेपुढे करण्याचे काम सध्या सुरू आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या ३१ आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराला त्याचे प्रतिनिधी मतमोजणी सभागृहात आणता येतात. प्रत्येक टेबलला एक प्रतिनिधी याप्रमाणे उमेदवाराला पास वितरीत करण्यात येतात. पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी १०२ टेबल असणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय त्याची रचना करण्यात येते. त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला १०२ पास मिळतील. 


उमेदवारांची संख्या ३१ असली तरी त्यातील प्रमुख उमेदवार दोनच आहेत. त्यांना जास्त मतमोजणी प्रतिनिधी आणण्याची गरज असते. प्रमुख उमेदवार वगळता अन्य उमेदवारांना त्यातही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांना मतमोजणी प्रतिनिधींची विशेष गरज नसते. अपक्ष असले तरीही त्यांना प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासारखेच सर्व अधिकार असतात, त्यामुळे त्यांनाही पास मिळतातच. या त्यांच्यासाठी जास्त असलेल्या पासचा काही जणांकडून बाजार केला जात असल्याचे दिसते आहे. फुकट मिळणाऱ्या या पासवर पैसे कमवण्याचा उद्योग होत आहे.
प्रशासनाकडून आला उमेदवार की दिले त्याच्याजवळ पास असे केले जात नाही. त्यासाठी उमेदवाराला जेवढे पास तेवढ्या कार्यकर्त्यांची नावे त्यांच्या प्रत्येकी दोन छायाचित्रांसह प्रशासनाला द्यावी लागतात. त्यांची छाननी केली जाते. त्यानंतरच पास वितरीत केले जातात. प्रत्येक पासवर नाव, संबधित प्रतिनिधीचे छायाचित्र असते. त्यावरही आता पासची विक्री करणाऱ्यांनी मात केली आहे. 
ज्यांच्याबरोबर व्यवहार केला जात आहे, त्यांच्याकडून त्यांच्याच कार्यकर्त्यांची नावे व छायाचित्र प्रशासनाकडे स्वत:चे कार्यकर्ते म्हणून दिले जात आहेत. त्यामुळे मतमोजणी सभागृहात या कार्यकर्त्यांना त्या उमदेवाराची मतमोजणी प्रतिनिधी म्हणून विनासायास प्रवेश मिळेल व एकदा आत गेल्यानंतर ते कार्यकर्ते आपल्या मुळ उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून मतमोजणी टेबलजवळ बसू शकतील. 
प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. त्यांना सर्वांनाच मतमोजणीसाठी आत यायचे असते. त्याशिवाय उमेदवारालाही त्याच्या काही अनुभवी कार्यकर्त्यांचे मतमोजणी सुरू असताना तिथे उपस्थित असणे आवश्यक वाटते. त्या सर्वांना आत घ्यायचे तर तेवढट्या मोठ्या संख्येने पास मिळत नाही.अपक्ष उमेदवारांकडून पास घेऊन कार्यकर्त्यांच्या मतमोजणी सभागृहातील प्रवेशाची व्यवस्था करणे त्यांना सोपे होते. त्यामुळेच प्रशासनाने पास वितरीत करण्याआधीच काहीजणांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्क साधतआहेत. काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे. 
....
अशी होते मतमोजणी
सभागृहात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होते. टेबलच्या एका बाजूला मतदानयंत्र व कर्मचारी तर दुसऱ्या बाजूला उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी असतात. मध्ये लोखंडी जाळी असते. राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष, मग अपक्ष या क्रमाने मतमोजणी प्रतिनिधींना बसवले जाते. प्रत्येक यंत्र आले की त्याचा क्रमांक दाखवून सील तोडले जाते. त्यानंतर प्रत्येक मताची मोजणी प्रतिनिधींना दाखवत केली जाते. यंत्र दाखवेल त्याप्रमाणे मतदान कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधी मतांची कागदावर नोंद करतात. प्रत्येक फेरीची मतमोजणी याप्रमाणे होते.

Web Title: Lok Sabha Elections: Counting Pass business in superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.