लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:10 AM2024-07-28T06:10:20+5:302024-07-28T06:10:46+5:30
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार दिला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार दिला जातो.
मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ग्रामीण विकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुधा मूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे, अशी घोषणा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) लोकमान्य टिळक यांची १०४ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी ६ वाजता विशेष सोहळ्यात सुधा मूर्ती यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
असे आहे पुरस्काराचे स्वरूप
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.