असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:11+5:302021-08-15T04:14:11+5:30
------------------------ सन १८८१ च्या ४ जानेवारीला ‘केसरी’ आणि त्या आधी दोन दिवस ‘मराठा’ ही वृत्तपत्रे अनुक्रमे मराठी आणि इंग्रजीतून ...
------------------------
सन १८८१ च्या ४ जानेवारीला ‘केसरी’ आणि त्या आधी दोन दिवस ‘मराठा’ ही वृत्तपत्रे अनुक्रमे मराठी आणि इंग्रजीतून प्रसिद्ध होऊ लागली. इंग्रजीत लोकमान्य टिळक यांनी केलेले लिखाण जहाल होते, ते इंग्रजांना कळत होते, पण जे मराठीत होते त्याची दखल त्यांना अँग्लो इंडियन वृत्तपत्रांच्या आणि टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करून घ्यावी लागत होती. ‘केसरी’त काय लिहिले गेले आहे, ते टाइम्सला कळवले जात असे आणि त्यावर त्या वृत्तपत्राची मल्लीनाथी आली की, इंग्रज शासकांचा जळफळाट होत असे. वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांच्या खुनाचे प्रकरण १८९७ मध्ये घडले. त्या प्रकरणात लोकमान्य टिळकांना अडकवायचा प्रयत्न झाला. आगरकरांनी केसरी सोडल्यावर टिळक ‘केसरी’त लिहू लागले आणि त्यांच्या लेखनाची धार ही १८९२ नंतर अधिक झळाळली. त्याच काळात दादाभाई नवरोजी यांनी ब्रिटिश पार्लमेंटात केलेल्या भाषणात भारताच्या दारिद्र्यासंबंधात चिंतन केले. सर वेडरबर्न यांनी दादाभाईंच्या भाषणाचाच सूर पकडून इंग्रजी राज्यव्यवस्थेने सामान्य नागरिकांचे किती नुकसान करून ठेवले आहे, असा मुद्दा मांडला तेव्हा टिळकांनी ‘आमच्यावर जुलूम कसा होतो?’ हा अग्रलेख २४ जानेवारी १८९३ रोजी लिहिला आणि तिथूनच त्यांच्या इंग्रज सरकारवरच्या टीकेला वजन प्राप्त झाले.
या अग्रलेखात त्या काळात इंग्रजी राज्यव्यवस्थेवर भाळलेल्या तेव्हाच्या सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही वर्गातल्या पुढारपणाला झोडपून काढले. टिळकांचा हा अग्रलेख ही इंग्रजी सरकारबद्दल असलेल्या समजाला मिळालेली कलाटणी होती आणि समाजात हे सर्व आपण अपसमज करून घेत आहोत ही भावना वाढीस लागली. ‘इंग्रजांच्या राज्यात आंधळ्याने काठीस सोने बांधून काशीपासून रामेश्र्वरपर्यंत जावे असे लोक म्हणू लागले. परंतु, दारुचा अंमल ज्याप्रमाणे फार काळ टिकत नाही त्याचप्रमाणे राज्यक्रांतीपासून उत्पन्न झालेला हा भ्रमही उत्तरोत्तर दूर होत चालला. आंधळ्याने काशीस सोने बांधून जावे हे खरे, पण सोनेच उत्तरोत्तर दुर्मिळ होत चालले ही गोष्ट लोकांच्या जास्त लक्षात येऊ लागली,’ या अग्रलेखातल्या प्रतिपादनानंतर टिळकांनी मागे पाहिलेच नाही.
टिळकांपूर्वीचा महाराष्ट्र हीनदीन होता. त्यात चैतन्य फुंकण्याचे काम प्रामुख्याने टिळकांनी केले. १८९७ मध्ये जेव्हा महाराष्ट्र प्लेगसारख्या महामारीला बळी पडला तेव्हा टिळकांनी इंग्रजांच्या विरोधात लेखणीचे अस्त्र परजले आणि रँड-आयर्स्ट यांच्या जुलूमशाहीला थेट अंगावर घेतले. रँड आणि आर्यस्ट मारले गेले. टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात येऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यातल्या सहा महिन्याची शिक्षा मॅक्समुल्लर सारख्यांनी केलेल्या आवाहनामुळे कमी झाली. टिळकांचे पांडित्य हे त्या काळात दर्यापार किती गेले होते हे यावरून कळावे.
लोकमान्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःची चतुःसूत्री बनविलेली होती. त्यात राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार याचा समावेश होता. जे जे हत्यार भारतीय स्वातंत्र्यासाठी वापरता येईल ते वापरलेच पाहिजे याविषयी त्यांचा कटाक्ष असे. मुंबईत १९०६ मध्ये पोस्टमनांचा संप झाला. टिळकांनी त्या संपाला पाठिंबा तर दिलाच, पण पोस्टमनांना त्या काळी मुंबईत मिळणाऱ्या २० रुपये पगारात तेव्हाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जगून दाखवावे असे थेट आव्हानही दिले. २८ ऑगस्ट १९०६ रोजी त्यांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘हा पोटापाण्याचा प्रश्न आहे.’ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्षपद हे टिळकांकडे सोपवले जाणार असल्याची माहिती अनेकांना नसते. ‘तुम्ही आयटकचे अध्यक्षपद स्वीकारावे’, असे टिळक यांना सांगायला दिवाण चमनलाल सरदारगृहात गेले होते. दिवाण चमनलाल यांना लोकमान्यांनी सांगितले की, आता माझ्या वृत्ती अतिशय क्षीण होऊ लागलेल्या आहेत, त्यामुळे यापुढल्या काळात माझ्यावर फार विसंबून राहणे चुकीचे होईल. तथापि त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारायचे मान्य केले होते. १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर मुंबईतल्या २ लाखांवर गिरणी कामगारांनी त्या शिक्षेच्या निषेधार्थ सलग सहा दिवस संप घडवून आणलेला होता, या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे असे मानून त्यांनी त्यास होकार दिला होता, पण ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही, कारण दरम्यान त्यांचे निधन झाले होते.
चौकट
टिळकांची भीती
टिळकांना तेव्हाचे ब्रिटिश सरकार किती घाबरायचे याचे एक उदाहरण. १९०७ मध्ये टिळकांनी मुंबईत ठिकठिकाणी स्वदेशी संबंधात सभा घेतल्या. एक सभा चिंचपोकळीला झाली. या सभेविषयी मुंबईचे तेव्हाचे पोलीस आयुक्त एच. जी. गेल यांनी सरकारच्या न्याय खात्याच्या सचिवाला लिहिलेल्या एका पत्राची प्रत मिळाली आहे. त्यात मुंबईत तेव्हा कापड गिरण्यांची संख्या ८५ असल्याचे नमूद करून लोकमान्यांच्या सभेला दोन लाख जनसमुदाय उपस्थित असल्याचे म्हटले आहे. “सर्व गिरण्यांमध्ये मिळून असणाऱ्या कामगारांची संख्या एक लाखावर आहे. त्यापैकी ५० हजार कामगार तरी सुदृढ म्हणता येतील असे असतील. जर एवढ्या मोठ्या संख्येने कामगारवर्ग त्यांच्या सभांना हजर राहात असेल तर टिळकांपासून ब्रिटिश सरकारला किती धोका आहे हे लक्षात घ्या,” असा इशारा गेल यांनी या पत्रात दिला आहे. याच पत्रात गेल लिहितात, “आपण जे ब्रिटिश शिपाई (गोरे) या देशात आणले आहेत, त्यांची संख्या जेमतेम दोन लाख भरते आणि टिळक यांच्या सभेला जर एवढी प्रचंड गर्दी जमत असेल तर त्यांच्यापासून किती धोका आहे, हे लक्षात घ्या.” थोडक्यात टिळक यांनी मनात आणले तर काहीही करू शकतात हेच त्यांना सुचवायचे असावे असे या पत्रावरून दिसते. टिळकांना १९०८ च्या खटल्यात जलद गतीने न्यायालय भरवून शिक्षा करण्यामागे हीच कपटनीती असली पाहिजे हे उघड आहे.
चौकट
परराष्ट्रमंत्री की पंतप्रधान?
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ अशी घोषणा करणारे टिळक देशातल्या जनतेचे कंठमणी बनले होते. देशाच्या काही भागात त्यांना ‘महाराज’, काही भागात ‘आचार्य’, काही भागात ‘महर्षि’ मानीत, पण टिळकांना कोणी त्यांचा उल्लेख प्राध्यापक असा केला तर त्याने ते अधिक खुलत असत, असे त्यांच्या चरित्रकारांनी म्हटलेले आहे. ते खरेच आहे. त्यांना ‘तुम्ही स्वराज्यात कोण होणार? परराष्ट्रमंत्री की पंतप्रधान,’ असे विचारले जाताच क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी दिलेले उत्तर हे अधिक बोलके आहे. ते तेव्हा म्हणाले होते, ‘जर आज स्वराज्य दिले तर मी परत फर्ग्युसन महाविद्यालयात परत जाईन आणि गणित शिकवायला लागेन.’ त्यांचे हे उत्तर त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करणारे आहे.