लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार! शरद पवारांच्या हस्ते PM मोदींना सन्मानित करण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:29 PM2023-07-24T12:29:24+5:302023-07-24T12:29:54+5:30
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले
पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील; तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा अधिकृत दौरा अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून; तसेच जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस दलाकडून या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.