लोकमान्य टिळकांनी वाचविली पाटलांची पोलीसपाटीलकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:30 PM2019-08-01T13:30:24+5:302019-08-01T13:32:52+5:30
जुन्नर शहराचे पहिले वतनदार पोलीस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील यांनी १८९६ मध्ये ब्रिटिशकाळात आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत केलेल्या लोकांच्या सेवेबद्दल लोकमान्य टिळकांनी गौरवोद्गार काढले होते.
नितीन ससाणे -
जुन्नर : जुन्नर शहराचे पहिले वतनदार पोलीस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील यांनी १८९६ मध्ये ब्रिटिशकाळात आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत केलेल्या लोकांच्या सेवेबद्दल लोकमान्य टिळकांनी गौरवोद्गार काढले होते, तसेच यातून निर्माण झालेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे गावाच्या पोलीस पाटील वतनाविषयी निर्माण झालेला वाद टिळकांनी हुशारीने मिटविला होता.
जुन्नर नगरपालिकेची स्थापना १८६१ मध्ये झालेली आहे. अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील १८८५ ते १८९९ मध्ये या काळात १४ वर्षे नगरपालिकेत नगर सदस्य म्हणून कार्यरत होते. १८९६ मध्ये जुन्नरला प्लेगच्या साथीत अनाजी बुट्टे-पाटील वगळता सर्व नगर सदस्य गाव सोडून निघून गेले होते. तथापि अनाजी बुट्टे-पाटील यांनी प्लेगच्या साथीवर मात करण्यासाठी प्लेगप्रतिबंधक उपाययोजना केली. प्लेगच्या साथीने ग्रामस्थ गाव सोडून गेल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अनाजी पाटील यांनी शहरात गस्त घालून नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण केले होते. त्यांची सचोटी, सेवाभाव व कर्तृत्वाने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने १८९७ मध्ये त्यांना जुन्नरचे वतनदार पोलीस पाटील म्हणून नियुक्त केले होते. टिळकांबद्दल अनाजी पाटलांना आदर होता. टिळकांच्या विचाराचे लोक नगरपालिकेवर निवडून आल्यास जुन्नरचे भले होईल, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न होते.
जुन्नरमधील टिळकभक्त असलेले मोहन मार्तंड खत्री यांच्या सहकार्याने अनाजी पाटलांनी लोकमान्य टिळकांना जुन्नरभेटीचे निमंत्रण दिले होते. १९०४ मध्ये लोकमान्य टिळक जुन्नरला आले असता त्यांनी अनाजी पाटलांच्या कार्याबद्दल व त्यांनी प्लेगच्या साथीत लोकांच्या केलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले होते. ब्रिटिश राजवटीच्याविरोधात लढणारे व दैनिक केसरीतून ब्रिटिशांवर आग ओकणाऱ्या टिळकांवर ब्रिटिशांचा रोष होता. त्यामुळे लोकमान्य टिळकांना मदत करणारे अनाजी बुट्टे-पाटील ब्रिटिशांचे शत्रूच आहेत, त्यांची पोलीस पाटीलकी काढून घ्यावी, अशी तक्रार अनाजी पाटलांच्या विरोधकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केली होती. आपणाविषयी प्रतिकूल गोष्टी आम्हास माहिती असून आपली पोलीस पाटीलकी काढून का घेऊ नये, अशी नोटीस कलेक्टरांनी अनाजी पाटलांना पाठवली होती. त्यावेळी अनाजी पाटलांनी ही नोटीस घेऊन पुण्यात गायकवाडवाड्यात टिळक यांची भेट घेतली. टिळकांनी पाटलांना निश्चिंत राहण्यास सांगून मार्ग काढतो, असे सांगितले. नंतर लोकमान्य टिळकांनी कलेक्टरांना भेटून जुन्नरचा पाटील आम्हास फार उपद्रव देत आहे, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, असे सांगितले.
.........
कलेक्टरने काढला नोटीस मागे घेण्याचा हुकूम
टिळकांबद्दल कलेक्टरला आदर होता, ते अनाजी पाटलांबद्दल आपल्याला चुकीची माहिती सांगणार नाहीत, खालच्या अधिकाºयांनी चुकीचा अहवाल दिला असावा, असे समजून कलेक्टरने पाटलांना दिलेली नोटीस मागे घेण्याचा हुकूम काढला व अशा प्रकारे अक्कलहुशारीने टिळकांनी पाटलांची पोलीस पाटीलकी वाचविली. ही हकीकत इंदूताई टिळक व मृणालिनी ढवळे यांनी संपादित केलेल्या टिळकांची आठवण या ग्रंथात आहे. तसेच अनाजी व त्यांचे पुत्र समयज्ञ रावसाहेब बुट्टे-पाटील यांच्या नरव्याघ्र या चरित्र पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.