लोकमत उत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन : राजकारणाचा अचूक वेध, मान्यवरांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:54 AM2018-11-07T01:54:40+5:302018-11-07T01:55:22+5:30

महाराष्ट्राला १०० हून अधिक वर्षांची दिवाळी अंकांची परंपरा आहे. या परंपरेमध्ये ‘लोकमत’ने संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा कायम राखला आहे.

Lokmat Festival Diwali Issue Publication: The Perfect Inspiration of Politics, | लोकमत उत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन : राजकारणाचा अचूक वेध, मान्यवरांचा सूर

लोकमत उत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन : राजकारणाचा अचूक वेध, मान्यवरांचा सूर

Next

पुणे - महाराष्ट्राला १०० हून अधिक वर्षांची दिवाळी अंकांची परंपरा आहे. या परंपरेमध्ये ‘लोकमत’ने संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा कायम राखला आहे. ‘लोकमत’च्या ‘उत्सव’ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून स्थानिक राजकारण, निवडणुकांचा माहोल आणि त्या पार्श्वभूमीवर तयार होत असलेले जनमत, स्थानिक प्रश्न, राजकारण आणि मीटू अशा विविधांगी विषयांवर प्रकाश टाकण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
‘लोकमत’तर्फे ‘उत्सव’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक (जाहिरात) हरजीत सिंग उपस्थित होते.
नरके म्हणाले, ‘निवडणुकीचा माहोल हळूहळू रंगू लागला आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने यापुढील काळातील हालचाली महत्त्वाच्या असणार आहेत. या कालावधीत जनमत कशा प्रकारे आकार घेईल, याची चाचपणी जिल्हापातळीवर या माध्यमातून करण्यात आली आहे. पुणे हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. संपूर्ण भारताच्या राजकारणाला दिशा देण्याची ताकद त्या काळात पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे पुण्यातील जनमानस, त्यांच्या अपेक्षा, सरकारबद्दल मतमतांतरे, स्थानिक पातळीवरील घडामोडी यादृष्टीने या दिवाळी अंकात वेध घेण्यात आला आहे.’
पवार म्हणाले, साहित्य आणि विनोदावर अनेक विशेषांक निघतात. पण, राजकारण हा विषय दिवाळी अंकांपासून दुर्लक्षित राहिला आहे. राजकारण मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती बिघडत आहे. लोकशाहीमध्ये राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय राजकारणावर अनेक जण बोलतात, मात्र स्थानिक राजकारणावर चर्चा घडत नाहीत.

लोकमत दीपोत्सवचा अंक दर्जेदार

‘लोकमत’तर्फे राज्यपातळीवर प्रकाशित होणारा ‘दीपोत्सव’ हा अंक अत्यंत दर्जेदार आहे. ‘दीपोत्सव’ यंदा १६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्रातील एकूण ४०० दिवाळी अंकांचे संख्यात्मक गणित पाहता, त्यामध्ये ५० टक्के वाटा ‘लोकमत’चा आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. ‘दीपोत्सव’मधील यंदाच्या लेखांचे विषय, मांडणी अत्यंत अचूक पद्धतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राजकारणात महिलांना ३३ टक्के आणि नंतर ५० टक्के आरक्षण मिळाले. ‘दीपोत्सव’मध्ये यंदा ८० टक्के वाटा महिलांचा आहे. १३ पैकी १० लेख महिलांचे आहेत. यामध्ये संवेदशील विषयांचा तितक्याच संवेदनशीलतेने मागोवा घेण्यात आला आहे, अशा शब्दांत प्रा. हरी नरके यांनी ‘लोकमत’च्या दीपोत्सव या दिवाळी अंकाची प्रशंसा केली.

Web Title: Lokmat Festival Diwali Issue Publication: The Perfect Inspiration of Politics,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.