Lokmat impact : 'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:18 IST2025-02-07T16:15:01+5:302025-02-07T16:18:29+5:30
सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या 'कलाग्राम' प्रकल्पामध्ये बेवड्यांच्या पार्ट्या सुरू असल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले.

Lokmat impact : 'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस
- हिरा सरवदे
पुणे : कलाग्राम प्रकल्पाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने महापालिकेने चार कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकत थेट घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या सैनिक सिक्युरिटी या ठेकेदार कंपनीलाही नोटीस बजावल्याची माहिती महापालिका उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिली. दरम्यान, दैनिक लोकमतच्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी कलाग्रामच्या परिसराची स्वच्छता केली.
सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या 'कलाग्राम' प्रकल्पामध्ये बेवड्यांच्या पार्ट्या सुरू असल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक असतानाही आतमध्ये दारूच्या पार्ट्या होतातच कशा? असा सवाल उपस्थित केला जात होता. प्रकरणाची गंभीर दखल घेतवसुरक्षा विभागाने सहाय्यक सुरक्षा अधिकारी व जमादार यांना कलाग्राम प्रकल्पाच्या परिसरात पाठवत पाहणी करून तातडीने अहवाल देण्यास सांगितले होते.
तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही प्रकल्पाची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडीनंतर येथे नेमलेल्या आलेल्या चार कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर कारवाई करत कामावरून काढण्यात आले आहे. तसेच सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ठेकेदार कंपनीलाही नोटीस बजावली आहे.
प्रकल्पाकडे नव्हते प्रशासनाचे लक्ष
सिंहगड रस्त्यावरील पानमळ्याजवळ महापालिकेने २७ एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारले आहे. येथे जपानी शैली आणि मुघल शैलीचे गार्डन, राज्य व देशातील ग्रामीण कलाकृती, लोककला मांडणारे कलाग्राम साकारले आहे. तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे उदघाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी झाले. याला साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. उदघाटनानंतर महापालिका प्रशासनाचे या प्रकल्पाकडे फारसे लक्ष नाही. त्याचाच फायदा मद्यपींकडून घेतला जात आहे.
संयुक्तपणे राबविली स्वच्छता मोहीम
कलाग्राम प्रकल्पाच्या परिसरात ओल्या पार्त्या झडत आहेत. याशिवाय प्रकल्पात पालापाचोळा व कचरा पसरत आहे. याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच महापालिकेचा भवन विभाग, मालमत्ता विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांनी सुरुवातीला एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकली होती. अखेर महापालिकेचा भवन विभाग, उद्यान विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाने संयुक्तपणे स्वच्छता मोहीम राबवून गुरुवारी कलाग्रामचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.