Lokmat Impact| ससूनमधील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांच्या नातेवाइकांकडे पैसे मागणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 10:13 AM2022-08-26T10:13:50+5:302022-08-26T10:15:03+5:30
बंडगार्डन पोलिसांकडून आरोपीला अटक....
पुणे : मी ससूनमधून सीएमओ बोलत आहे. तुमच्या रुग्णाच्या उपचारासाठी अर्जंट औषधांची गरज आहे. मी ते औषध खरेदी करतो. त्यासाठी दिलेल्या क्रमांकावर तातडीने पैसे पाठवा, असे सांगून रुग्णांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमित जगन्नाथ कांबळे (वय ३६, रा. फिरस्ता) याला अटक केली आहे. येरवडा कारागृहात असताना त्याने तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर मिळवून त्यांना निलंबित करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते.
याप्रकरणी ससून रुग्णालयाचे सीएमओ डॉ. पराग वराडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून २२ ऑगस्टदरम्यान ससून रुग्णालयात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ससून रुग्णालयात सीएमओ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावाने ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाइकांना फोन करून मी डॉ. पराग बोलतोय, असे सांगून त्यांना ६ हजार ३०० रुपये पाठविण्यास सांगितले. तसेच आणखी एका महिला रुग्णांना फोन करून औषधोपचार खर्चापोटी ६ ते ७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची बदली न करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकार लक्षात आल्यावर ससून रुग्णालयाच्यावतीने फिर्याद दिली. पैसे ज्या खात्यात जमा झाले, त्याचा शोध घेतला असता तो अमित कांबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले. अमित कांबळे याला दर आठवड्याला डायलेसिस करावे लागते. त्यासाठी तो ससून रुग्णालयात येत असतो. त्यातून त्याने तेथील रुग्णांच्या नातेवाइकांचे क्रमांक मिळवून त्यावर डॉक्टरांच्या नावाने फोन करून फसवणूक केली. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत असंख्य लोकांना फसविले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करीत आहेत.