लोकमतचा दणका : पालिकेच्या दवाखान्यांमधील लॅब झाल्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:35 PM2019-09-10T12:35:01+5:302019-09-10T12:41:19+5:30

सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची आणि एक्स रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत.

Lokmat impact : Labs started in municipal clinics | लोकमतचा दणका : पालिकेच्या दवाखान्यांमधील लॅब झाल्या सुरू

लोकमतचा दणका : पालिकेच्या दवाखान्यांमधील लॅब झाल्या सुरू

Next
ठळक मुद्देबिले अदा करण्यासाठी ऑनलाईन सिस्टीम सुरू करण्याचे आदेशमहापालिकेचे शहरात छोटेमोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृह दवाखान्यांमध्ये रुग्णांची रक्त, लघवी आदी नमुने घेण्याची व्यवस्थापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आरोग्यासारख्या संवेदनशील विषयामध्येही उदासिनतेचे दर्शन

पुणे : कोट्यवधींची बिले थकल्याने ठेकेदाराकडू बंद करण्यात आलेली महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधील पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजीची (एक्स रे) सेवा आठ दिवसांनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने पावले उचलत ठेकेदाराची थकीत तसेच नियमित बिले देण्याकरिता ऑनलाईन पेमेंट सिस्टीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेवा सुरू झाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने ३० ऑगस्टपासून सेवा देणे बंद केले होते. पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका रुग्णांना सहन करावा लागत होता. महापालिकेचे शहरात छोटेमोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृह आहेत. या दवाखान्यांमध्ये रुग्णांची रक्त, लघवी आदी नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग, लेखापरीक्षण विभाग आणि ठेकेदार यांच्या समन्वयाअभावी हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची आणि एक्स रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत.
पालिकेच्या दवाखान्यांमध्ये शहरी गरीब योजना, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या तपासण्या मोफत केल्या जातात. परंतु, ३० ऑगस्टपासून ही सेवा बंद होती. पालिकेने कृष्णा डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांना पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजी सेवा पुरविण्याचे कंत्राट दिलेले आहे. परंतू, आजमितीस तब्बल साडेतीन कोटींची थकबाकी असल्याने संस्थेला पगार व अन्य खर्च भागविणे अवघड झाल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आरोग्यासारख्या संवेदनशील विषयामध्येही उदासिनतेचे दर्शन घडत असल्याचे चित्र महापालिकेत दिसत आहे.
====
कृष्णा डायस्नोस्टीक कडून पालिकेला १५ जून रोजी पत्र देऊन त्यावेळची अडीच कोटी रुपयांची थकबाकी देण्याविषयी कळविले होते. वास्तविक ४० दिवस आधी कळवूनही पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. आजमितीस पालिकेकडे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार, अन्य खर्च करणेही संस्थेला अवघड होऊ लागले आहे. पाठपुरावा करायला गेलो तर अधिकारी आमच्या कर्मचाऱ्यांशी नीट वागत नाहीत की व्यवस्थित बोलत नाहीत. पालिकेला कमी दरामध्ये सेवा पुरवूनही कोट्यवधी रुपयांची थकबाकी का ठेवली जाते हा प्रश्न आहे.
- कपिल देशमुख, कृष्णा डायग्नोस्टीक सर्व्हिसेस
====
पालिकेच्या दवाखान्यांमधील सेवा सुरू करण्याबाबत कृष्णा डायस्नोस्टीक सर्व्हिसेससोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी सोमवारी सकाळपासूनच सर्व दवाखान्यांमधील सेवा पूर्ववत सुरू केली आहे. ठेकेदाराची बिले देण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार असून त्याची प्रणाली तयार करण्याच्या सूचना पालिकेच्या आयटी विभागाला देण्यात आल्या आहेत.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका

Web Title: Lokmat impact : Labs started in municipal clinics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.