Lokmat Impact : कोरोनामुळे झाली होती माय - लेकाची ताटातूट; पोलिस अन् डॉक्टरांच्या मध्यस्थीने पुन्हा नात्याची साधली एकजूट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:31 PM2021-03-24T19:31:54+5:302021-03-24T19:32:31+5:30
पोलिसांच्या अन डॉक्टरांच्या मध्यस्थीने आईला केले मुलाच्या स्वाधीन; दोघांचीही काढली समजूत
कल्याणराव आवताडे -
धायरी: कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वतःच्या आईला घरात घेण्यास मुलाने नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मुलगा व सुन हॉस्पिटलमध्ये आईला घेण्यासाठी तात्काळ आले.
'लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध करताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तात्काळ घटनेची दखल घेत मुलाला व सुनेला पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन केले. त्यानंतर आईला घरी घेऊन जाण्यास मुलगा तयार झाला. दरम्यान लोकमतचे वृत्त बघून अनेक समाजसेवा संघटनांनी लायगुडे रुग्णालयातील असणाऱ्या ७० वर्षीय पार्वतीबाईंची (नाव बदलेले आहे) भेट घेऊन आधार दिला. तसेच काहींनी त्यांना नवीन कपडेही भेट दिले. घरातील अंतर्गत वादामुळे मुलाने व सुनेने आईला सांभाळायला नकार दिला होता. मात्र पोलिसांच्या व डॉक्टरांच्या समुपदेशाने त्यांच्यात समेट घडला आहे.
पार्वतीबाईंना कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांना १४ मार्च रोजी सिंहगड रस्त्यावरील वडगांव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला फोन करून तुमच्या आईला आज डिस्चार्ज देतो आहोत, असे सांगितले असता तुम्ही तिला इकडे आमच्या घरी पाठवू नका तिला तिकडेच कायमची ठेवा, असे धक्कादायक उत्तर त्याने दिले होते. त्यानंतर डॉक्टरांनी वारंवार मुलाला फोन केले असता त्याने डॉक्टरांचे फोनच उचलणे बंद केले. डॉक्टरांनी ताबडतोब सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधून पार्वतीबाईंना पोलिसांसोबत रुग्णवाहिकेतून घरी पाठविले असता दरवाजाला कुलूप असल्याने पोलिसांनी पुन्हा त्यांना लायगुडे रुग्णालयाच्या स्वाधीन केले होते.दरम्यानच्या काळात लायगुडे रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्वतीबाईंची निस्वार्थीपणे सेवा केली.
.......
आईमुळे गेला सासऱ्यांच्या जीव; मुलाचा आरोप
७० वर्षे वय असतानाही ती कोरोनाच्या काळात घराबाहेर फिरते. सकाळी ९ वाजता घराबाहेर गेली कि ती रात्री दहा वाजताच घरी परत येते. तिला कोरोना झाल्यामुळे सासऱ्यांना कोरोना झाला व त्यात त्यांचे नुकतेच निधन झाले. काही गोष्टी सांगूनही ती ऐकत नसल्याने आईबद्दलची असणारी आपुलकी कमी झाली असल्याचे पार्वतीबाईंच्या मुलाने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
...........
दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या मुलाला फोन करून डिस्चार्ज देत असल्याचे सांगितले असता त्यांना कोठेही सोडा, माझ्या घरी नका आणू असे सांगितल्याने आम्हाला धक्काच बसला. मात्र आता दोघांनाही समजावून सांगत त्यांच्या नात्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
- डॉ. शुभांगी शहा, वैद्यकीय अधिकारी, लायगुडे रुग्णालय.
नात्यामध्ये जिव्हाळ्यापेक्षा एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षामुळे अनेक घरांमधील संवादाची जागा विसंवादाने घेतली आहे. यामुळेच या गोड नात्यामध्ये चिडचिड, अहंकार, हेवेदावे, मतभिन्नता वाढतेय. आई- वडील आणि मुलांच्या नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी संवाद हे एकच रामबाण औषध आहे.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे.