लोकमत प्रभाव : आता खासगी प्रयोगशाळांवर 'वॉच';शक्यतो शासकीय प्रयोगशाळांमध्ये चाचणी करावी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:40 PM2020-07-23T23:40:56+5:302020-07-23T23:45:01+5:30
खासगी लॅबला कोविड चाचणीचे दर निश्चित करून दिले आहेत. पण त्यानंतरही लॅबकडून वाढीव पैसे उकळले जात आहेत...
पुणे: खासगी प्रयोगशाळांची विश्वासार्हता,डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केल्या जाणा?्या चाचण्या, मनमानी कारभार अशी उदाहरणे समोर येत आहेत. नागरिकांनी केवळ स्वत:ला वाटते म्हणून नव्हे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शक्यतो शासकीय प्रयोगशाळांमध्ये चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. खासगी प्रयोगशाळांविरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
सध्या पुणे जिल्ह्यामध्ये आयसीएमआरची मान्यता असलेल्या ११ शासकीय आणि १५ खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज सरासरी ७५००-८००० चाचण्या होत आहेत. शासकीय प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे ४०००-४५०० चाचण्या केल्या जातात. २५ ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अनेक नागरिक शासकीय प्रयोगशाळांऐवजी खासगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यास पसंती देतात. मात्र, खासगी प्रयोगशाळांमधील रिपोर्ट चुकीचे आल्याच्या अनेक तक्रारी आजवर समोर आल्या आहेत. याशिवाय, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारून खासगी लॅब नियम धाब्यावर बसवत असल्याचे वास्तव 'लोकमत'ने समोर आणले आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आपल्याला वाटते म्हणून चाचणी करून घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि लक्षणे दिसत असतील तरच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
खासगी लॅबला कोविड चाचणीचे दर निश्चित करून दिले आहेत. पण त्यानंतरही लॅबकडून वाढीव पैसे उकळले जात आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकही या फसवणुकीला बळी पडत आहेत. नागरिकांची धास्ती लक्षात घेऊन लॅबकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही टेस्ट केल्या जात आहेत. शासन घोषणा करून रिकामे झाले; पण प्रत्यक्ष योग्य प्रकारे अंमलबजावणी होतेय की नाही, याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महापालिकेडून तातडीने कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
----
कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चाचणी करण्याबाबत निर्णय घ्यावा. त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे. नागरिकांनी विनाकारण खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमुळेही लवकर निदान होत आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
-----
खासगी लॅब प्रतिनिधींची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. खाजगी प्रयोगशाळांविरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने नोटीस पाठवून खुलासा मागवला जाईल आणि गरज वाटल्यास कारवाई केली जाईल.
-रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त